बुलडाणा : जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या हृदयद्रावक घटने नंतर वाकी बुद्रुक गावासह बनसोडे कुटुंबावर शोककळा पसरली असून समाजमन हेलावून गेलं आहे. (Buldhana Two Children Death by drowning Farm pond)
देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील मदन आप्पाजी काकड यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले असून गावातील अनेक युवक या शेततळ्यात नेहमीच पोहण्यासाठी जातात. घटनेवेळी परिसरातील अनेक मुले आणि युवक शेततळ्यात पोहण्याचा आनंद घेत होते. यावेळी मुले पोहत असताना शेततळ्यातील गाळात पाय अडकून एक मुलगा पाण्यात बुडू लागला असता इतर युवकांनी पाहिले अन् वाचवण्यासाठी काही मुलांनी पाण्यात झेप घेतली.
यादरम्यान, आरडाओरड केल्याने नजीकच्या शेतात काम करीत असलेले दोन युवक शेततळ्याच्या दिशेने धावले… तोपर्यंत दोन- तीन मुले पाण्यात बुडाले होते, तर तिघांना त्यांनी शेततळ्या बाहेर ओढून आणले नंतर पाण्याखाली बुडालेल्या दोघा मुलांना बाहेर काढण्यात आले… घटनेची माहिती गावापर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांनी शेततळ्याकडे धाव घेतली… या घटनेत सोहम परमेश्वर बनसोडे (वय 12) याचा जागीच मृत्यू झाला तर अमरदीप शंकर बनसोडे (वय 14) यास देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले..
या दुर्दैवी घटनेने वाकी बुद्रुक सह बनसोडे कुटुंबावर शोककळा पसरली असून समाजमन हेलावून गेले आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने मृत मुलांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या ओठी मुलांचीच चर्चा आहे.
(Buldhana Two Children Death by drowning Farm pond)
हे ही वाचा :
जुन्या भांडणाचा राग, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची हत्या, पाच आरोपींना काही तासातच अटक
लै पुण्य लागल ब्वा… नांदेडच्या अवलियाची रुग्णसेवा, समाजाला ‘नको’ असलेल्या उपेक्षितांचा ‘कायापालट’!