गोंदिया : डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्यास महागात पडू शकते. होय हे खरे आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon) तालुक्यातील एका महिलेने 9 दिवसांत तब्बल 110 वेळा डायल 112 वर कॉल केला. वरून खोटी माहिती दिली. हे तिला चांगलेच महागात पडले. तिला सहा महिन्यांसाठी कारावासात जावे लागले. एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (Mobile no) पोलिसांच्या डायल 112 या क्रमांकावर वारंवार कॉल येत होते. एका लहान मुलाचा मर्डर झाला आहे. त्वरित पोलीस मदत पाठवा. अशी माहिती दिली जात होती. नंतर तो मोबाईल बंद करण्यात येत होता. त्या महिलेने 9 दिवसात तब्बल 110 वेळा डायल 112 वर कॉल करून खोटी दिली. पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम (Police Inspector Somnath Kadam) यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले.
चौकशी केली असता, ती महिला पोलिसांना खोटी माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दहा दिवसांत हे प्रकरण न्यायालयासमोर आले. अर्जुनी मोरगाव प्रथम सत्र न्यायालयाने त्या खोटारड्या महिलेला पाचशे रुपये दंड आणि सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती देणे त्या महिलेला चांगलेच भोवले आहे. ठाणेदार, अर्जुनी मोरगाव पो. स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम म्हणाले, कॉल केल्यानंतर पोलीस जात होते. पण, तसं काही घडलेलं राहत नव्हते. त्यामुळं त्यांनी सखोल चौकशी केली. संबंधित महिला खोटी बोलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून प्रकरण कोर्टात गेलं. न्यायालयानं तिला शिक्षा सुनावली. पोलिसांनी योग्य पद्धतीनं तपास केला. त्यामुळं आता अशी खोटी माहिती देणाऱ्यांवर वचक बसणार आहे, असंही कदम यांनी सांगितलं.
महाराष्ट्र पोलिसांनी कुणावर अन्याय, अत्याचार, चोरी, मारहाण आणि गुन्हेगारीवर त्वरीत आळा बसावा यासाठी डायल 112 प्रणाली सुरू केली. मात्र, त्याही प्रणालीचा दुरूपयोग करून संबंधित महिलेने तब्बल 110 वेळा कॉल करीत खोटी माहिती दिली. पोलीसांची दिशाभूल करीत त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. डायल 112 ही प्रणाली नागरिकांच्या सोयीसाठी केलेली आहे. पण, पोलिसांना त्रास होत असेल, तर ते त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. सोमनाथ कदम यांनी सहा महिन्यांपूर्वी चार्ज घेतला. तेव्हापासून या भागात गुन्ह्याचं प्रमाण कमी आहे. पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या महिलेलाही त्यांनी धडा शिकविला आहे.