अहमदनगर : अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी (Chandramukhi) सिनेमातलं ‘चंद्रा’ गाणं (Chandra Song Viral) गाणारा सहावीतला विद्यार्थी तुम्ही पाहिला असेलच. शाळेच्या वर्गात इतर मुलांच्या हजेरीत युनिफॉर्ममध्ये गाणारा हा मुलगा युनिकच होता. इन्टाग्राम, फेसबुकवर (Facebook) आपल्या व्हिडीओची त्याने अनेकांना दखल घ्यायला भाग पाडलं. बघता बघता तो व्हायरल झाला. या मुलाला टीव्ही 9 मराठीनं शोधून काढलंय. या मुलाशी, त्याच्या आईवडिलांशी टीव्ही 9 मराठीच्या टीमने एक्स्क्लुझिव्ह बातचीत केलीय. इतकंच काय तर खास चंद्रा गाणंदेखील या चिमुरड्यानं सादर केलंय.
चंद्रा गाण्यातून व्हायरल झालेल्या या सहावीतील मुलाचं नाव जयेश खरे आहे. तो मूळचा राहुरी तालुक्यातील वांजुळपोई गावचा रहिवासी. आपल्या आईवडिलांसह तो राहतो.
वांजुळपोई गावात राहणारा सहावीतील जयेश नेवासा तालुक्यातलं टॅलेंट आहे. अख्ख्या तालुक्यात सध्या त्याच्या व्हायरल गाण्याची चर्चा रंगलीय. करजगावातील छत्रपती शिवाजी विद्यालयात तो शिकतो.
जयेशच्या शिक्षकांनी त्याचा गातानाचा एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. त्यानंतर या मुलाची आणि या मुलाच्या पालकांची टीव्ही 9 मराठीच्या टीमने भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
जयेशला सुरांची ओळख ही त्याच्या वडिलांमुळे झालीय. जयेश एका अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा. त्याचे वडील विश्वास खरे हे ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट आहेत.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची! सहा महिने ऑर्केस्ट्रात काम करायचं. त्यातून थोडेफार पैसे कमावयचे. उरलेल्या दिवसात शेतमजुरी करायची आणि संसाराचा गाडा हाकायचा. फावल्या वेळेत मुलाला सुरांची ओळख करुन द्यायची. त्याच्या कलेला प्रोत्साहन द्यायचं, हे जयेशचे वडील विश्वास खरे नियमितपणे करतायत.
आपल्या मुलानं मोठं व्हावं, नाव कमवावं, गायक म्हणून प्रसिद्धी मिळवावी, अशी इतर पालकांप्रमाणे जयेशच्या वडिलांचीही इच्छा आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलंय की,…
लहानपणापासून जयेश गुणगुणायचा. चार वर्षांचा असल्यापासून त्याचं गुणगुणणं मला चांगलं आठवतंय. दुसरीत असताना तो शाळेच्या गॅदरिंगमध्ये गायला. तेव्हा प्रामुख्यानं वाटलं, की आपला मुलगा गाऊ शकतो. त्याच्यात एक मोठा गायक लपलाय, असं राहून राहून वाटत राहतं.
घरची परिस्थिती पाहता त्याला संगीत शिक्षण देण्याची आर्थिक कुवत खरे कुटुंबीयांची सध्या तरी नाही. पण मुलाचं टॅलेंट पाहून, त्याचा व्हायरल व्हिडीओ पाहून त्याला आर्थिक मदत करावी. त्याच्या संगीत शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा आणि सहकार्य करावं, अशी कळकळीची विनंती जयेशच्या वडिलांनी केली आहे.
जयेशचा सुरेल गळा, सुरांशी असलेली त्याची नैसर्गिक ओळख, यामुळे एक उत्तम गायक होण्याचे सगळे गुण जयेशमध्ये आहेत. कोणत्याही वाद्याशिवाय जयेशने गायलेला चंद्रा गाणं फेमस झालं, हा त्याचा एक प्रकारे पुरावाच आहे. महाराष्ट्राच्या गावागावात जयेश सारखं टॅलेंट लपलेलंय. सोशल मीडियामुळे आता हे टॅलेंट तुफान गाजतंय. महाराष्ट्रातल्या या लिटल टॅलेंटची कदर करण्याची गरज आता यानिमित्ताने व्यक्त होतेय.