चंद्रपूर : राज्यभरातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची ओळख आहे. चंद्रपूर शहरात मनपा उष्माघातविरोधी आराखडा राबवत आहे. शहर मनपा हद्दीत उष्माघातापासून नागरिकांना बचावासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. शहरातील मनपा (Municipal Corporation) व जिल्हा रुग्णालयातील वॉर्डात रुग्णांसाठी कोल्ड वॉर्ड तयार केले गेले आहेत. दुपारच्या वेळेस अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन मनपाने केले आहे. शहरातील पार्क- बागांमध्ये दुपारच्या सुमारास विसाव्यासाठी मोकळीक दिली गेली आहे. शहरातील विविध भागात व चौकांमध्ये थंड पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत स्प्रिंकलर्सची सोय करण्यात आली. यामुळं काहिलीपासून दिलासा दिला जात आहे. चंद्रपूर शहरातील तापमान (Temperature) राज्यातील सर्वाधिक 45.4 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. म्हणूनच सातत्याने वाढणाऱ्या तापमानाचा मुकाबला करण्यासाठी मनपा प्रशासन (Administration) सज्ज झाल्याचं चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी सांगितलं.
नागपुरात आज 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांनंतर पुढील आठवड्यात हे तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. चंद्रपुरातील तापमानही पुढील आठवड्यात 44 ते 45 अंशांपर्यंत जाणार आहे. अकोल्यात आज 42.6 तापमानाची नोंद झाली. यात पुढील आठवड्यात वाढ होणार आहे. अकोल्याचे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्हा हा हॉट जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्हात एप्रिल आणि मे महिन्यात ऊन खूप तापते. अंगाची लाही लाही होते. त्यामुळे APMC मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी चोहोट्टा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्या स्थानिक विकास निधीतून शेतकऱ्यांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची मशीन लावण्यात आली. पण ही मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. ही RO मशीन लवकरात लवकर चालू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.