नीलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे आजारपणाने आज पहाटे निधन झाले. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी तेही रुग्णालयात होते. वडिलांच्या अंतीम संस्कारासाठी ते भद्रावती येथे जाऊ शकले नाही. बाळू धानोरकर यांची प्रकृती खराब असल्याने त्यांनी उपचारासाठी नवी दिल्लीत पाठवण्यात आले होते. आज सकाळी एअर ambulane नी त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणण्यात येईल. संध्याकाळी वरोरा येथे अंतिम संस्कार होणार आहे.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा स्तिमित करणारा प्रवास केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यानी लवकरच पूर्ण केला.
युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. 2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.
लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला. लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले आहेत.
शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे त्यांचे निधन झाले.