निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही शहरालगत एक भयंकर घटना घडली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. मधमाशांनी 40 जणांवर हल्ला केला असून, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे स्मशानभूमीत एकच हाहाःकार उडाला. यानंतर परिस्थिती निवळल्यानंतर मयतावर सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिंदेवाही येथील स्थानिक नागरिक राजू मार्तंडवार यांचे आज निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शेजारी, नातेवाईक जमले होते. दुपारच्या सुमारास राजू यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरु होते. यादरम्यान स्मशानभूमीत अचानक मधामाशा घुसल्या आणि अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांवर हल्लाबोल केला.
मधमाशांचा हल्लाबोल होताच अंत्यसंस्काराला जमलेले सर्व लोक प्रेत सरणावर सोडून स्मशानभूमीत पळू लागले. तब्बल 40 लोक मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती निवळल्यावर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी यवतमाळमध्ये घडली. मधमाशांच्या हल्ल्यात 50 जण जखमी झाले आहेत. दोन लहान मुलांसह अनेक महिला गंभीर जखमी आहेत. यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरात ही घटना घडली. हल्ल्यानंतर वधू-वराकडील नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी नाल्याच्या पाण्यात उडी मारली. लग्नमंडपातून नातेवाईकांनी पळ काढल्याने अन्नाची नासाडी झाली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर जखमींनी बचावासाठी लोकांनी जंगलात धाव घेतली.