नीलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : परिस्थितीचं काहीही नसतं. मी तुमच्यासारखी साधारण घरातील आहे. साधारण घरची मुलगीसुद्धा काहीही करू शकते. लहानपणी प्रत्येक घरी टीव्हीच्या शोधात फिरत होती. आता तुमच्यासमोर उभी आहे. स्वतःच्या घरच्यांचा सपोर्ट पाहिजे आहे. तो मला माझ्या घरच्यांकडून मिळाला. अभ्यासात सातत्य आणि नियोजन असले तर यश नक्की मिळते, असे शालू घरत म्हणाली. शाली घरत हिने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तिचे गावात धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ती बोलत होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरवाणी गावातील अत्यल्प भूधारक शेतमजुराची मुलगी अधिकारी झाली. मुलींनं गावाचं नाव मोठं केलं. तिच्या यशानंतर गावाने ढोल, ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. फुलांचा वर्षाव केला. महिलांनी औक्षण केलं. गावानं केलेलं भव्य दिव्य स्वागत बघून ती भावनिक झाली.
चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील शालु शामराव घरत हिने प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट क परीक्षेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात तिचा प्रथम क्रमांक मिळवला. आता ती उद्योग निरीक्षक पद भूषविणार आहे. शालू घरत हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय पूर्ण करून विज्ञानातील पदवी (बीएस्सी ) चे शिक्षण नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयातून पूर्ण केले. सध्या तिचे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण सुरु आहे. दरम्यान तिने स्पर्धा परीक्षा वर्गामध्ये प्रवेश घेतला.
ब्राईटएज फाउंडेशनच्या मॅजिक परिवारामार्फत देण्यात येणाऱ्या सहारा शिष्यवृत्तीकरिता शालुची निवड करण्यात आली. या शिष्यवृत्तीमधून दरमहा आर्थिक मदत तिला मिळत होती. त्यामुळे तिला पुणेसारख्या शहरात विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. शालूने मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे.