नांदेड : एमआयएमचे ओवेसी यांनी काही वर्षांपूर्वी नांदेडमार्ग महाराष्ट्रात प्रवेश करत मनपा निवडणुकीत चांगले यश मिळवले. नांदेडमध्ये एमआयएमला मिळालेल्या यशानंतर ओवेसी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले यश मिळवले. त्यानंतर हैद्राबादचेच दुसरे नेते अर्थात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नांदेड मार्गच महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ पाहतायत. अवघ्या दोन महिन्यांच्या काळात केसीआर यांनी नांदेडमध्ये आज दुसऱ्यांदा जाहीर सभा घेत आहेत.
तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत विद्युत पुरवठा आहे. तसेच दर वर्षाला एकरी दहा हजारांची मदत सरकारकडून दिली जाते. त्यासोबतच दलित महिला अल्पसंख्याकासाठी तेलंगणा सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील काही गावांनी आम्हाला तेलंगणा राज्यात समाविष्ट करा अशी मागणी केली होती.
प्रादेशिक पक्षाचे रूपांतर राष्ट्रीय पक्षात करण्याच्या संधीत असलेल्या या मागणीकडे केसीआर यांचे लक्ष वेधल्या गेले. त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या आपल्या प्रादेशिक पक्षाचे भारत राष्ट्र समिती असे नामकरण करत केसीआर यांनी गेल्या पाच फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये पहिली सभा घेतली होती.
या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून केसीआर यांच्या अपेक्षा उंचावल्या. त्यांनी नांदेडकडे अधिकचे लक्ष दिले. त्यानंतर माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, सुरेश गायकवाड यांच्यासह यशपाल भिंगे यांनी बीएसआरमध्ये प्रवेश केला. याच प्रवेशाची जाहीर सभा आज लोहा इथे घेण्यात आलीय.
नांदेडमधल्या बाभळी बंधाऱ्याच्या पाणी वाटपाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बाभळी बंधाऱ्यातील पाणी महाराष्ट्राला वापरता येत नाही. या कारणावरून मनसेने केसीआर यांच्या नांदेड दौऱ्याला गेल्यावेळी विरोध केला होता.
मात्र बाभळी प्रकल्प अत्यंत छोटा आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांच्या समन्वयातून हा प्रश्न सोडवता येईल, असे केसीआर यांनी त्यावेळीच पत्रकार परिषदेत सांगितले. नांदेडमध्ये यापूर्वी ओवेसी यांच्या एमआयएमने इन्ट्री करत मनपात तेरा जागा जिंकल्या होत्या. आता त्यानंतर दुसरा एक “हैद्राबादी” नेता नांदेडमधून राजकीय इन्ट्री करतोय.
पण राज्यात असलेल्या पक्षांची भाऊगर्दी पाहता बीआरएसला मराठी मुलखात कितपत प्रतिसाद मिळतो, ते आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. कारण केवळ सभेला होणारी गर्दी राज्यातील अनेक नेत्यांच्या सभांना होते. मात्र प्रत्यक्षात मतदान करताना मराठी माणूस कमालीचा चोखंदळ आहे, हे आजवर सिद्ध झाले आहे.