नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नंदुरबारमध्ये एक दोन नव्हे तर जवळपास दहा हजार बालविवाह झाल्याची धक्कादायक (Shocking) बातमी पुढे आली असून यातील जवळपास 2305 मुलींनी अठरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच बालकांना जन्म देखील दिलायं. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान कुपोषणावरुन सुरु झालेल्या चर्चेदरम्यान महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतच्या कारणांची माहिती देत असतांनाच बालविवाहाची (Child marriage) आकडेवारी समोर ठेवली आणि साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाला माहिती देण्याच्या अनुशंगाने विभागाने बालविवाहाबाबत एक सर्वेक्षण केले होते.
कोरोनाच्या अडीच वर्षानंतर 52 हजार 773 मुलींचा विवाह झाला. यातील 18.96 टक्के मुलींचा बालविवाह झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा आकडा 9 हजार 983 इतका असून राज्यात आतापर्यतच्या बालविवाहाची ही सर्वात मोठी नोंद असेल. याहुन धक्कादायक बाब म्हणजे यातील 4.37 टक्के म्हणजे 2305 महिला या अठरा वर्षाच्या आत गर्भवती झाल्या आणि त्यांनी बाळांना जन्म देखील दिलायं. या आकडेवारीने प्रशासनच अचंभीत झाले असून यापुढे असे बालविवाह होणार नाहीत, यासाठी काळजी घेणार असल्याचे प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळातच बालविवाह रोखण्यासाठी ग्रामपातळीवर समित्या नेमल्या गेल्या आहेत. ज्यागावांमध्ये बालविवाह झाले त्या गावातल्या ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तलाठींना याबाबत काही माहीती असू नये याहुन दुर्दवी बाब कुठली असू शकते. विशेष म्हणजे गेल्या काही काळात नंदुरबार मधल्या पोलीस प्रशासनाने देखील बालविवाह रोखलेत. मात्र त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेत पोलीसांना याबाबत कळवले. मात्र अडीच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात जर बालविवाह होत असतील तर प्रशासन आणि महिला बाल विकास विभाग करत तरी या होत असा प्रश्न पडतोय. आदिवासी बहुल भागात मुली जन्माचा दर हा शंभरहुन अधिक आहे. अशातच आता समाजातील वैचारीक घटकांनी पुढे येत याबाबत देखील व्यापक स्तरावर जनजागृती करुन बालविवाह रोखण्याची गरज व्यक्त होत आहे.