चंद्रपूर : AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या कामी महत्त्वाचे साधन ठरू पाहत आहे. राज्यातील विविध भागात वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास वसलेल्या गावांना वन्यजीव हल्ल्याचा सतत धोका असतो. यामुळे या गावातील पारंपरिक आणि शेतीकामे देखील प्रभावित झाली आहेत. प्रसंगी अगदी अंगणात येऊन मुले आणि महिलांवर हल्ला करण्याइतपत वाघ, बिबटे यांचा वावर दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षात उत्तम संवर्धनामुळे राज्यात वाघांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत वाघांचा मानव वस्तीकडे वावर सहाजिक वाढला आहे. आकडेवारीनुसार मानव -वन्यजीव संघर्षात गेल्या सहा वर्षात अडीचशे लोकांचा मृत्यू झाला आहे.
यावर उपाय म्हणून वनविभागाने एका तज्ज्ञ समिती गठीत केली होती. या समितीने दिलेल्या निर्णयानुसार ए आय आधारित अशा पद्धतीच्या यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे. सीतारामपेठ गावात ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गावाच्या दिशेने येणारे वन्यजीव त्यांचे फोटो प्राप्त होतात. मोठ्याने सायरन वाजू लागल्याने ग्रामस्थ सतर्क होत स्वतःचा बचाव करू शकत आहेत. असे विकास चोखे आणि प्रतिमा गजबे यांनी सांगितले.
ही संपूर्ण यंत्रणा खर्चिक आहे. क्लाऊड आधारित यंत्रणा असल्याने अचूक असली तरी त्याचा देखभालीचा खर्चही असणार आहे. मात्र पहिल्याच प्रयत्नात समाधानकारक यश मिळाल्याने अधिकारी देखील उत्साहित आहेत.
या पुढच्या काळात सर्वाधिक मानव- वन्यजीव संघर्षग्रस्त गावांना प्राधान्याने अशी यंत्रणा उभारण्याची योजना दृष्टीपथात आहे. या यंत्रणेच्या उभारणीमुळे व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनावरचा ताण कमी होणार असल्याचे बफर सहायक वनसंरक्षक बापू येले यांनी सांगितले.
आताच्या घडीला वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या ग्रामस्थाला नुकसान भरपाई स्वरूपात 8 लाख एवढी रक्कम द्यावी लागते. या रकमेत देखील सुमारे दुप्पट वाढ करण्याची ग्रामस्थांची सततची मागणी आहे. ही बहुतांशी योग्य आहे. गेलेला जीव परत आणणे अशक्य बाब आहे.
अशा स्थितीत आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा उभारणे म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक समजली जात आहे. घटनेनंतर उपचारापेक्षा खबरदारी घ्यावी हे नक्की. AI यंत्रणेची ही गुंतवणूक पुढच्या काळात वनव्याप्त क्षेत्रातील ग्रामस्थांचा जीव वाचविण्याच्या कामी येणार आहे.