सांगलीमधील मिरज शहरात आज उद्धव ठाकरे सेनेने जोरदार आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याआधी ठाकरे गट आक्रमक झाला. बसस्थानकातील बसेसेवर लावण्यात आलेले मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला काळे देखील फासण्यात आले. त्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोस्टराला लावले काळे
सांगलीच्या मिरजेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान ठाकरे आणि शिंदे गट शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. रत्नागिरी येथे पार पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी सांगली डेपोतल्या बसेस मोठ्या प्रमाणात रवाना करण्यात आले आहेत. यावरुन आक्षेप घेत ठाकरे गट शिवसेनेकडून मिरज बस स्थानकामध्ये ठिय्या मारत आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी बसस्थानकातील बसेसेवर लावण्यात आलेले मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला काळे देखील फासण्यात आले.
दोन्ही गट आमने-सामने
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. यामुळे मिरज बस स्थानकामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यावेळी दोन्ही गटाचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या लाडकी बहीण मेळाव्यासाठी मिरज आणि सांगली एसटी डेपोतील बसेस मोठ्या प्रमाणात रवाना करण्यात आल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, असा आरोप करत शिवसेना ठाकरे आंदोलन करण्यात आलं होतं.
एसटीचे वेळापत्रक कोलमडलं
साताऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा झाला. आता रत्नागिरीत मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातून एस टी बस रत्नागिरीला मागवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व डेपोमधून 144 बसेस रत्नागिरीला पाठवण्यात आल्या आहेत. परिणामी साताऱ्यातील एसटी बसचे वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने त्याविरोधात आज मिरजेत आंदोलन केले.