अहमदनगर : अज्ञात कारणावरुन गोदावरी नदीत उडी घेत एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील कोपरगाव शहरात आज घडली आहे. गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरुन दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तरुणीने उडी घेत जीवनयात्रा संपवली. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून दुपारी एक महाविद्यालयीन तरूणी पाण्यात उडी मारत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल कोळी व धोंगडे यांनी स्वतः वर्दी काढून पाण्यात उडी मारली आणि तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. स्थानिक मच्छिमारांना सोबत घेऊन अग्नीशमन दलाकडून तरुणीचा शोध घेण्यात आला. सुमारे तीन तास शोध मोहिम राबवूनही अग्नीशमन दलाला तरुणीचा शोध घेण्यास यश आले नाही. त्यानंतर अंधार पडल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली असून उद्या सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु करण्यात येणार आहे.
दरम्यान घटनास्थळी तरुणीचे बॅग सापडली आहे. मात्र तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. तरुणीचे नाव काय? ती कोणत्या परिसरात राहते? कोणत्या महाविद्यालयात शिकते ? पाण्यात उडी मारुन आत्महत्या करण्यामागे काय कारण आहे? या सर्व प्रश्नांची माहिती पोलीस तपासानंतरच समोर येईल. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. (College girl commits suicide by jumping into Godavari in Ahmednagar)
इतर बातम्या