नगर: कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेवर लागलेली वर्णी आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना धक्का देण्याची राम शिंदे यांनी जोरात तयारी सुरू केली आहे. कर्जत येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुलेंनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. चर्चा गुलदस्त्यात असली तरी काँग्रेस नेत्याच्या मदतीनेच रोहित पवार यांना धक्का देण्याचा राम शिंदे यांचा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.
राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी राम शिंदे आणि काँग्रेसन नेते प्रविण घुले यांची बंद खोली आड दोन तास चर्चा झालीये. विधानसभा आणि नगरपंचायती निवडणुकीत घुले यांनी रोहित पवारांना पाठींबा दिला होता. घुलेंची भावजय कर्जत नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष आहे.
गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. त्यात घुलेंनी शिंदेची भेट घेतल्याने राजकिय चर्चांना उधाण आलंय. मात्र नेमकी भेट कशामुळे घेतली याच कारण समजून शकले नाही. मात्र, या भेटीच्या निमित्ताने घुले राम शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रवीण घुले यांची कर्जत तालुक्यात मोठी ताकद आहे. ते जिल्हा परिषद सदस्य देखील होते. सध्या आमदार रोहित पवारांना त्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते राम शिंदे यांच्या संपर्क असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे घुले यांनी राम शिंदे यांना पाठिंबा दिला तर पुन्हा राम शिंदे यांची ताकद मतदारसंघात वाढणार आहे. त्यामुळे रोहित पवारांना हा धक्का असणार आहे. तर रोहित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे