प्रसिद्ध क्रिकेटपट्टू प्रवीण आमरे यांना महसूल खात्याने दंड ठोठावला आहे. अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खन्नाचा ठपका महसुल विभागाने ठेवला आहे. या जागेत बेकायदेशीर बांधकाम आणि वाळू उत्खन्नन केल्याचा आरोप महसूल विभागाने केला आहे. माहिती अधिकाराखाली याप्रकरणात माहिती विचारल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. मंडळ अधिकाऱ्याने याविषयीचा अहवाल दिला होता. त्यानंतर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण, किती आहे दंडाची रक्कम?
जयगड येथे बांधकाम
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडमधील ग्रामपंचायत रीळ हद्दीत समुद्र किनाऱ्याजवळ क्रिकेटपट्टू प्रवीण आमरे यांचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात येत होता. रत्नागिरी तहसील कार्यालय, महाराष्ट्र सागरी मंडळ यांची कोणतीही परवानगी त्यासाठी घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. हे संपूर्ण बांधकाम अनधिकृत आहे. वाळूचा भराव घालण्यात आला आहे. तर त्यासाठी कांदळवनाची तोड करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
मंडळ अधिकाऱ्याचा अहवाल काय
ग्रामपंचायत रीळ हद्दीतील हे बांधकाम गट क्रमांक 644 क्षेत्रात समुद्राच्या बाजूला आहे. त्यासाठी खारफुटी कांदळवन तोडून समुद्राच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. 7/12 नुसार हे बांधकाम 430 चौरस मीटर असताना प्रत्यक्षात ते एकूण 681.72 चौरस मीटरवर असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. समुद्राच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचे अहवालात म्हटलं आहे.
प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 44 आणि 45 अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली. तर कलम 48(7) अन्वये दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली. त्यानुसार, अनधिकृत वाळू उत्खननाबाबत 12,50,000 रुपये आणि रॉयल्टी पोटी 15,000 रुपये असा एकूण 12 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस महसूल विभागाने आमरे यांना बजावली आहे. रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी नोटीस बजावली आहे. महसूल विभागाकडून नोटीसला उत्तर देण्यासाठी प्रवीण आमरे यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.