चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरमध्ये वैनगंगेच्या नदीपात्रातून मृतांचे सांगाडे निघू लागले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ हादरून गेले आहेत. प्रशासनाने तात्काळ या घटनेकडे लक्ष देऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. सांगाडे निघाल्याने कुत्री आणि श्वापदं नदी परिसरात वावरण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणसांवर हल्ला होण्याची शक्यताही आहे. हा प्रकार घडण्याआधीच प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणारी वैनगंगा नदी आहे. नदीच्या पूर्व दिशेच्या काठावर गडचिरोली जिल्ह्याचा गडचिरोली तालुका, तर नदीच्या पश्चिम दिशेच्या काठावर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र आटत आले आहे. या ठिकाणी स्मशानभूमी नाही. त्यामुळे लोक वैनगंगेच्या पात्रातच मृतांवर अंत्यसंस्कार करत आहेत. पात्रात प्रेते जाळली जात आहे. तर काही मृतांचं पात्रातच दफन केलं जात आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाणी ओसरल्यानंतर आता पात्रात मृतांचे सांगाडे दिसत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
दफनविधीसाठी आरक्षित केलेल्या जागेमध्ये मृतदेहाचे दफन न करता चक्क नदीपात्रामधील रेतीत मृतदेह दफन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नदी पात्र ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. हा प्रकार जिल्हातील सावली तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे या नदी पात्रातून अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो. ज्या नदीपात्रात मृतांना दफन केलं जातं, त्याच नदीचं पाणी प्यावं लागत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
या नदीच्या बाजूलाच वाळूतही मृतांचं दफन केलं जात आहे. आता या वाळूतूनही मृतांचे सांगाडे बाहेर आले आहेत. वाळूतून चालताना पायाला सांगाडे लागत असल्याने स्थानिक भयभीत झाले आहेत. प्रशासानाने तात्काळ या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. सर्व सांगाडे ताब्यात घेऊन त्याचं विधीवत विसर्जन करावं. तसेच मृतदेह दफन करण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी जागा द्यावी, अशी मागणीही आता स्थानिकांमधून होत आहे.