शिर्डी: राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. शिंदे सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री दीपक केसरकर हे शिर्डीत आले आहेत. शिर्डीत आल्यावर त्यांनी साई बाबांचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून महाराष्ट्राचं कल्याण होऊ दे, असं साकडं केसरकर यांनी साईबाबांना घातलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला.
उद्धव साहेबांबद्दल मला आदर आहे. ते आता रस्त्यावर उतरले चांगले आहे. मात्र ज्यावेळी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची संधी होती तेव्हा उतरायला हवं होतं, असा चिमटाही दीपक केसरकर यांनी काढला.
जोपर्यंत सरकार अस्तित्वात होतं तोपर्यंत चेहऱ्यावर मास्क होता. पण सरकार गेल्यानंतर दुसऱ्या क्षणी मास्क उतरला. असं केल्याने जनतेत चुकीचा मेसेज जातो. आमच्यासारख्या आमदारांना सुद्धा भेट मिळत नव्हती. महाराष्ट्र ठप्प झालेला होता. विरोधी पक्षामध्ये गेल्यावर महाराष्ट्र अॅक्टिव्ह झाला का..? असा सवालही त्यांनी केला.
कोरोना काळातली देणी आम्ही फेडलीत. राज्य सक्षमपणे चालवावं लागतं. केंद्राकडे बोट दाखवून चालत नाही. आमचं सरकार नवीन टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात आणतंय. समृद्धी महामार्गासारखा रस्ता कोकणला जाण्यासाठी होणार आहे. त्यासाठी तुमचं राज्य येऊन चालत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
विरोधी पक्ष हा आंदोलन करतच असतो. पण आजचा विरोधी पक्ष नागरिकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हिंदू देव-देवतांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता, इथं मात्र महाराष्ट्र प्रेमी असल्याचं भासवता. संत लोकांचा अपमान करणाऱ्यांना बरोबर घेऊन जाताना सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही, अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली.
आमच्यातील कोणी चुकला तर आम्ही त्याबद्दल त्याला जाब विचारू. माफी सुद्धा मागायला लावू. थोर पुरुषांबद्दल नेहमी आदर ठेवला जाईल, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट महाराष्ट्रात घडतंय. त्यांनी वाईट बोललं की चांगलंच होत असतं. ज्यांच्याबद्दल संजय राऊत वाईट बोलले ती लोकं मोठीच झाली. संजय राऊतांनी दररोज वाईट बोलत राहावं. आम्ही आमचं काम चालूच ठेऊ, असा चिमटा त्यांनी काढला.