नांदेड : राजधानी नवी दिल्ली येथे ऐतिहासिक वास्तूंची (Historical Buildings), नैसर्गिक छायाचित्रे, कलात्मक पेंटिंग, साकारलेल्या वस्तू यांचे प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले आहे. 19 ते 28 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहता येणार आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय व ललित कला अकादमी यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून हे आयोजन करण्यात आलं. या कलादालनात देगलूरचे (Degalur) छायाचित्रकार किरण मुधोळकर (Kiran Mudholkar) यांच्या छायाचित्रांची निवड झाली आहे. ऐतिहासिक छायाचित्र प्रकारात देशभरातून 1 हजार 603 जणांनी आपली छायाचित्रे पाठविली होती. त्यातील 135 जणांच्या छायाचित्रांची (दोन बाय तीन स्क्वेअर फूट आकार) निवड करण्यात आली. त्यात किरण मुधोळकरचा समावेश आहे, देगलूरकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.
देगलूरचे युवा व हौशी छायाचित्रकार किरण मुधोळकर यांनी पाठविलेले होट्टल येथील ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिराचे छायाचित्र या प्रदर्शनात झळकले आहे. निवड करण्यात आलेल्या छायाचित्रकारांची नावे प्रदर्शनस्थळी तसेच ललित कला अकादमीच्या संकेत स्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
आपल्या वडिलांनी सुरू केलेला कमर्शियल फोटोग्राफीचा व्यवसाय पुढे नेत किरण मुधोळकर याने त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक अग्रगण्य वृत्तपत्रात किरणने काढलेली देगलूर शहरातील अनेक सार्वजनिक समस्यांची, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक कार्यक्रमांची तसेच निसर्ग छायाचित्रे शेकडो छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील विविध नगर परिषदांनी त्यांच्या कार्यालयात व सभागृहात किरणने काढलेल्या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची छायाचित्रे अडकवली आहेत. ललित कला अकादमीच्या प्रदर्शन निमित्ताने किरणचा राजधानी नवी दिल्लीत डंका वाजला आहे.