कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांची अचानक समोरासमोर भेट झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शाहूपुरीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) तिथे पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी यावेळी रस्त्यातच एकमेकांशी काही वेळ चर्चा केली. काही मिनिटांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
देवेंद्र फडणवीस आधी पोहोचले होते. लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. इतके दिवस कोणी आले नव्हते, तुम्ही आलात असं स्थानिक फडणवीसांना म्हणाले. त्याच वेळी उद्धव ठाकरेही शाहूपुरी इथे पोहोचले आणि आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. तर देवेंद्र फडणवीसांसोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सांगितलं की जर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली तर आम्ही त्या बैठकीला हजर राहू, असं कळवलं आहे.
चिखलीच्या गावकऱ्यांनी चंद्रकांतदादा-फडणवीसांना सुनावलं
दरम्यान, देवेंद्र फडणवीस प्रयाग चिखली या पूरग्रस्त गावातील नागरिकांची भेट घेण्यास दाखल झाले. “मंत्री असताना चंद्रकांत दादांनी, तुम्ही आश्वासनं दिली, ती अजून पूर्ण झाली नाहीत. मग आता परत तुम्ही आलात तर आम्हाला काही मिळणार का? तुम्हीही फक्त आश्वासनच देताय” असं चिखलीच्या गावकऱ्यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांना सुनावलं
“दादा आल्ते, त्यांनी शब्द दिल्ता, मारुती साक्षीला आहे”
“मागच्या टायमाला दादा आल्ते, त्यांनी शब्द दिल्ता, मारुती साक्षीला आहे. फक्त येतात आणि जातात, परत कुणी आमच्याकडे बघायला येत नाय” अशा शब्दात फडणवीसांच्या दौऱ्यात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पूर आला, की राजकारणी येतात नंतर मदत करायला कुणीही येत नाही, अशी चीड ग्रामस्थांनी व्यक्त केली.
फडणवीसांचं उत्तर
आम्ही घोषणा केली आणि सरकार गेलं, त्यामुळे आम्हाला फारसं काही करता आलं नाही. मुख्यमंत्रिपदाचा शेवटचा दिवस होता तेव्हा इथलं पाणी वळवण्यासाठी एक निर्णय घेतला होता पण परत आमचं सरकार गेलं, असं उत्तर फडणवीसांनी दिलं.
पाहा व्हिडीओ :