अमरावती: धनुष्यबाण चिन्हं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, असा विश्वास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. अमरावतीत युवा स्वाभिमानने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला संबोधित करताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. माझा हनुमान चालिसावर विश्वास आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हं शिंदे यांनाच मिळेल असा विश्वास आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. राणा यांच्या पूर्वीही शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल असा दावा केला आहे.
हनुमान चालिसा वाचलं म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकलं म्हणून आम्ही खचून जाऊ असं नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार घरात ठेवले, त्यांनीच आम्हाला तुरुंगात टाकलं. पण माझा हनुमान चालिसावर विश्वास आहे. माझा माझ्या देवावर विश्वास आहे. पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण चिन्हं मिळेल. एकनाथ शिंदे धनुष्यबाण चिन्ह घेऊनच निवडणुकीच्या मैदानात उतरतील, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांना कोविडची मोठी भीती होती. त्यामुळे ते फेसबुकवरूनच सरकार चालवत होते. माझ्याबदल नकारात्मक बोलणाऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. मी लोकांच्या कामाकडे लक्ष देत असते. हत्ती चले बाजार, तो कुत्ते भोकते हजार, असा हल्लाही त्यांनी चढवला.
शेतकरी असे आहेत की त्यांना काही शिकवण्याची गरज नाही. देशाला प्रगती पथावर नेण्यात आणि उंचीवर पोहोचवण्यात शेतकऱ्यांचा मोठा हात आहे. कोविडच्या काळातही शेतकरी राबराब राबले. त्यांनी अन्न पुरवण्याचं काम केलं. पाकिस्तानात पीठ मिळत नाहीये. पण अशी परिस्थिती भारतात आली नाही, असं त्या म्हणाल्या.
झिरो बजेटवर शेतकऱ्यांना शेती कशी करता येईल याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे कोणी कृषी मंत्री झाले असेल तर पंजाबराव देशमुख यांच्या नंतर अनिल बोंडें झालेत, असंही त्या म्हणाल्या.
शेतकरी कष्टकऱ्यांसाठी आम्ही वारंवार तुरुंगात गेलो. मी जेव्हापासून अमरावतीची सून झाली. तेव्हापासून तुरुंग आणि कोर्टात जावं लागतं. महिलांचा काळ पुसणारे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते, असंही त्यांनी सांगितलं.