धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी नियमावली तयार करण्यात आल्याचं आज सकाळी समोर आलेलं. मंदिर परिसरात याबाबत फलक लावण्यात आलेले. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्रीचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. पण या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे अखेर तुळजाभवानी मंदीर संस्थानने या निर्णयावरुन यु टर्न घेतल्याचं समोर आलं आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आलं आहे. अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना आता मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्यात आले होते. पण आता त्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
“मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी आणि भाविक भक्तांना कळविण्यात येते की, श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये पुजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत”, असं तहसीलदारांनी पत्रकात स्पष्ट केलं आहे.
मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावले. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाने सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक उपस्थित होते.