उस्मानाबाद : तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण होऊन तीन आठवडे लोटले आहेत. ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. दररोज वापरात असलेल्या 1 ते 7 क्रमाकांच्या डब्यांपैकी क्रमांक दोनच्या डब्यातले 8 ते 10 अलंकार गायब असल्याचे उघड झाले आहे. यात देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचू आहेत. हे अलंकार पुरातन असल्याने या दागिन्यांचे मुल्यांकन करता येणार नाही. हे अलंकार कधी गायब झाले याचा आज अंदाज बांधताही येत नाही, अशी स्थिती आहे. शिवकालीन अलंकाराच्या मोजणीचा अहवाल सादर करण्याची 12 जुलै डेडलाइन होती. पण पंचकमीटीने अहवाल 18 जुलै रोजी सादर केला.
तुळजाभवानी मातेला दान केलेल्या सर्व दागिन्यांची जून महिन्यात मोजणी करण्यात आली. यावेळी तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मौल्यवान अलंकारासह मातेला भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजदाद केली. मोजणीची संपूर्ण प्रक्रिया समिती सदस्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा पूर्ण करण्यात आली.
सर्व मौल्यवान अलंकारांची 1999 ची यादी, 1963 ची यादी तसेच 2010 च्या रजिस्टरप्रमाणे नोंदी घेण्यात आल्या. मोजणी पूर्ण झाल्यावर 1963 साली नोंदवलेल्या काही शिवकालीन अलंकाराच्या नोंदी आढळून आलेल्या नाहीत. काही पुरातन अलंकार काढून त्या ठिकाणी नवे कमी वजनाचे अलंकार ठेवले गेल्याचा पंच कमिटीला संशय आहे.
तुळजाभवानी मातेच्या ऐवजाची मोजणी प्रक्रिया 7 जूनला प्रारंभ होऊन 23 जूनला प्रक्रिया पूर्ण झाली. या दरम्यान 3 ते 4 दिवस मोजणी बंद होती. प्रत्यक्ष मोजणी 10 ते 12 दिवस चालली. मोजणीनंतर तीन आठवडे लोटल्यानंतर समिती सदस्यांनी अहवाल सादर केला आहे. हा अहवाल अद्याप जिल्ह्याधिकाऱ्यांनी स्विकारलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत.