अमरावती: अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची कालपासून सुरू असलेली मतमोजणी अखेर संपली आहे. तब्बल 30 तासानंतर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी काल सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली होती. सुरुवातीपासूनच धीरज लिंगाडे हे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी अवैध बाद मतांवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतर ही फेरमतमोजणी सुरू झाली होती. तब्बल 30 तास ही फेर मतमोजणी झाली. त्यात लिंगाडे हे विजयी झाले. त्यांनी मोठ्या फरकाने रणजित पाटील यांना पराभूत केले.
फेर मतमोजणीत नंबर तीनची मते अनिल अंमलकार मते मिळाली होती. तर लिंगाडे यांना दुसऱ्या पसंतीची 1453 मते मिळाली. त्यांनी 3368 मतांची आघाडी घेतली होती. तर रणजित पाटील यांच्या पारड्यात दुसऱ्या पसंतीची फक्त 625 मते पडली होती. लिंगाडे यांना या निवडणुकीत एकूण 46 हजार 330 मते मिळाली. तर रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली.
लिंगाडे हे नवखे उमेदवार होते. तर रणजित पाटील दोन वेळा निवडून आले होते. तिसऱ्यांदा निवडून आले असते तर त्यांनी हॅट्ट्रीक साधली असती. मात्र, त्यांची ही संधी हुकली. पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पाटील यांना महत्त्वाची खाती दिली होती. यावेळी पाटील निवडून आले असते तर त्यांना फडणवीस यांनी महत्त्वाची खाती दिली असती असं सांगितलं जातं.
पाटील निवडून यावेत म्हणून फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताकद पणाला लावली होती. तर लिंगाडे यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अचूक नियोजन केलं होतं. त्यामुळेच लिंगाडे यांचा विजय झाल्याचं सांगितलं जातं. तर भाजपला जुन्या पेन्शनचा मुद्दा भोवल्याचं सूत्रांनी सांगितलं.