चंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती आझाद बगीचा उद्घाटनाबाबत मोठा राजकीय वाद उभा ठाकला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते आझाद बागेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी वितरित केलेल्या निमंत्रणपत्रिकेत जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister), खासदार आणि स्थानिक अपक्ष आमदाराला आमंत्रित केलं नसल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळं उद्घाटनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे. तर दुसरीकडे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar ) यांनी कार्यक्रमाला बोलावले नाही तरी ‘मी जाणार आणि उदघाटन करणारच’ असं म्हणत म्हणत शहरात लावलेले “होय मी येणारच आहे”चे बॅनर लक्षवेधी ठरले आहेत. भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्या पत्रिकेमुळे आगामी निवडणुकीआधीच या उद्घाटनावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे.
चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता आहे. आमदार किशोर जोरगेवार हे अपक्ष आहेत. तर खासदार आणि पालकमंत्री हे काँग्रेसचे आहेत. मनपाच्या हद्दीत हा बगीचा सज्ज झालाय. याचे उद्घाटन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रोटोकॉलनुसार आयुक्तांसह स्थानिक खासदार, आमदार यांना बोलाविणं आवश्यक आहे. पण, तसं काही होणार नाही. त्यामुळं आयुक्तांनी हा मनपाचा कार्यक्रम नसल्याचं जाहीर केलं. एप्रिलमध्ये चंद्रपूर महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळं कामाच्या श्रेयवादातून हे होत आहे. हा बगीचा नगरसेवक संजय कंचल्लावार यांच्या प्रभागात शहराच्या मध्यभागी होत आहे. महापौर राखी कंचल्लावार आहेत. नागरिक या बगीच्याची प्रतीक्षा करत आहेत. याचे श्रेय आता कुणाला यावरून हे सारं सुरू आहे. हा कार्यक्रम कसा होतो, यावर सर्व अवलंबून आहे.