जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती; इतक्या जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

| Updated on: Mar 04, 2023 | 11:55 AM

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागासवर्गीय भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार बँकेचे तत्कालीन संचालक रवींद्र शिंदे, पांडुरंग जाधव, नंदा अल्लूरवार यांनी केली होती.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती; इतक्या जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
Follow us on

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०१३ मध्ये राबविलेल्या वादग्रस्त शिपाई आणि लिपिक पदाच्या भरतीत काही उमेदवारांना गुण वाढवून दिले होते. त्याप्रकरणी बँकेच्या संचालकांसह ११ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ मार्च रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहकार क्षेत्रासोबत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात फिर्यादी असलेले रवींद्र शिंदे यांच्यासह तिघांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

संभाषणाचा व्हिडीओ लाचलुचपत विभागाकडे

शेखर धोटे यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात २०१३ रोजी ही भरती २४ जागांसाठी झाली होती. बँकेच्या निवड समितीतील एक सदस्य रवींद्र शिंदे यांनी व्हिडीओ शुटिंग घेतली. त्या मुलाखतीत गुण वाढवून देऊन रक्कम गोळा करण्याचे संभाषण होतो. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ऑगस्ट २०१७ ला एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानुसार तत्कालीन बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार संचालक, ३ निवड समितीतील अधिकारी यांच्यासह तक्रारकर्ते रवींद्र शिंदे यांना आरोपी केले होते.

आरोपींमध्ये यांचा समावेश

तपास संथगतीने सुरू होता. माजी आमदार वामनराव चटप यांनी उच्च न्यायालयात सीआयडी चौकशीची मागणी केली होती. भरतीत अपात्र उमेदवारांना गुण वाढवून नेमणूक दिल्याचे आरोप सिद्ध झाले. सहकार खात्याने दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिली. त्यामुळे दोन मार्च २०२३ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. शेखर धोटे, विजय खेडीकर, रवींद्र शिंदे, नंदाताई अल्लुरवार, पांडुरंग जाधव, ललित मोटघरे, प्रभाताई वासाडे, लक्ष्मी पाटील, अशोक वाहाने यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

तक्रारदारही बनले आरोपी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागासवर्गीय भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार बँकेचे तत्कालीन संचालक रवींद्र शिंदे, पांडुरंग जाधव, नंदा अल्लूरवार यांनी केली होती. या प्रकरणाची चौकशी झाली. तेव्हा या तिघांचाही गैरव्यवहारात सहभाग असल्याचे पुढे आले. राज्य स्तरावर तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्याची दखल घेण्यात आली. एकंदरित हळूवार चाललेल्या या प्रकरणाचा तपास आणखी किती दिवस सुरू राहणार हे पाहावं लागेल.