यवतमाळ : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, भाजपला वेगवेगळे पक्ष फोडण्याची सवय आहे. महाराष्ट्रातचं नव्हे तर मध्य प्रदेशातही त्यांनी पक्ष फोडले. कर्नाटकातही पक्ष फोडले. स्वतःचा पक्ष वाढत नाही. तर, फोडा आणि राज्य करा. ही भारतीय जनता पक्षाची नीती राहिली आहे. सुरुवातीला भाजपनं असं दाखविलं की, आम्ही त्यातले नाहीत. पण, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, मी याला फोन केला होता. वहिनीसाहेबांनीही सांगितलं होतं की, देवेंद्र फडणवीस हे रात्री वेषांतर करून जात होते. त्यामुळं पक्ष फोडण्यात भाजपचा सहभाग होता, हे स्पष्ट आहे.
एकनाथ शिंदे गटानं मुंबई महापालिकेची तयारी सुरू केली आहे. विकासकामांचं ब्रँडिंगही केलेलं आहे. तरीही अरविंद सावंत म्हणतात की, ठाण्याच्या बाहेर मुख्यमंत्री शिंदे यांना कोणी ओळखत नव्हतं.
यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मुंबईचा विकास शिवसेनेनं साधला आहे. आधी मुंबई पाण्यात बुडत होती. आता ठाणे, नागपूर, पुण्याचीही तशीच परिस्थिती झाली. परंतु, मुंबई सुरक्षित राहिली.याचं कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेत झालेलं काम हे होय.
मुंबईचं काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याचं नेतृत्वात आतापर्यंत झालेलं आहे. याला कुणी थांबवू शकत नाहीत. नवीन सरकार आलं. तेव्हापासून मुंबई महापालिकेचा उपभोग घेणं सुरू आहे. अवाढव्य पद्धतीनं तीथं खर्च करणं सुरू आहे.
अधिकाऱ्यांवर अन्याय करणं सुरू आहे. याचा धडा मुंबईकर जनता या गद्दारांना शिकवतील, असंही अंबादास दानवे म्हणाले. ते यवतमाळ येथे आले असता माध्यमांशी बोलत होते.