नरेटिव्ह सेट करण्याआधी… देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना काय दिला सल्ला?

| Updated on: Dec 31, 2022 | 1:35 PM

महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होतं ते दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही केलं. त्यामुळे पुन्हा आता शासन-प्रशासन सुदृढ झालं आहे. आम्ही अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.

नरेटिव्ह सेट करण्याआधी... देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना काय दिला सल्ला?
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना काय दिला सल्ला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड : सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना जामीन देताना कोर्टाने जो निष्कर्ष काढला त्यावरून हे स्पष्ट होत असल्याचं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. पवार यांच्या या विधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांनी कोणताही नरेटिव्ह सेट करू नये. नरेटिव्ह सेट करण्यापूर्वी अनिल देशमुख यांच्या सुटकेचा कोर्टाने जो आदेश काढला आहे. तो जरुर वाचावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला आहे.

बीड येथे एका कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांना चिमटा काढला. मला त्यावर बोलायचं देखील नाही. त्या संदर्भात ईडी किंवा सीबीआय बोलेल. मी शरद पवारांना सांगेन नरेटिव्ह तयार करण्याआधी अनिल देशमुख यांच्या सुटकेचा जो आदेश… बेलचा… सुटका नाहीये ती. तो एकदा वाचून बघा. त्यानंतर असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा. मग तुमच्या लक्षात येईल कोर्टाने काय म्हटले ते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक म्हणा असं म्हटलं होतं. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं. राष्ट्र धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म… तिन्हीचं रक्षण त्यांनी केलं, असं ते म्हणाले.

संभाजी महाराजांना का बरं मारलं? त्यांना औरंगजेब काय म्हणत होता? तुम्ही धर्मांतरण करा असं औरंगजेब म्हणत होता. पण संभाजी महाराजांनी मान्य केलं नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म या करता हाल अपेष्टा होऊन त्यांचं बलिदान झालं आहे. त्यांच्या शरीराचे तुकडे केले. तरी त्यांनी स्वराष्ट्र, स्वराज्य आणि स्वधर्माची भाषा सोडली नाही, असं त्यांनी सांगितलं.

अजित पवारांनी किंवा त्यांच्या विचाराच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला. तरी देखील छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होतेच. पण ते धर्मवीर होते, असंही त्यांनी निक्षून सांगितले.

सरत्या वर्षाकडे तुम्ही कसं पाहता? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होतं ते दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही केलं.

त्यामुळे पुन्हा आता शासन-प्रशासन सुदृढ झालं आहे. आम्ही अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. 2023मध्ये महाराष्ट्राला वेगाने विकास पथावर नेण्याचं काम आमचं सरकार करेल, असं त्यांनी सांगितलं.