सांगली : सांगली जिल्ह्यातील 32 शिराळामध्ये शुक्रवारी (13 ऑगस्ट) साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीवेळी ‘ड्रोन कॅमेऱ्या’द्बारे वन विभाग नजर ठेवणार आहे. जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पाची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे गर्दी होऊ नये आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी जिवंत नागाची पूजा रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलीय. यासाठी 16 पथके तैनात करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी दिली आहे.
जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पाची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे. यामुळे जिवंत नागपूजेसाठी जगप्रसिध्द असलेल्या बत्तीस शिराळा येथे यंदाही प्रतिबंध लागू आहेत. दुसरीकडे कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने नागपंचमी निमित्त होणाऱ्या यात्रेवरही प्रतिबंध घालण्यात आले. ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई मंदिराचे दरवाजेही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र पारंपरिक पूजेसह प्रतिकात्मक नागपूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शिराळा परिसरात कोठेही सर्पाची हाताळणी अथवा प्रदर्शन होणार नाही यासाठी वन विभाग गेले चार दिवस जनजागृती केली. नागपंचमी वेळी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी वन कर्मचारी, पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वन विभागाची 6 फिरती आणि 10 गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. 2 ड्रोन कॅमेऱ्याद्बारे संपूर्ण परिसरावर सूक्ष्म नजर ठेवण्यात येणार आहे.
याशिवाय सांगलीत 6 चलचित्रीकरण कॅमेरे, एक श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. वन विभागाचे 4 सहायक वनरक्षक दर्जाचे 4 अधिकारी, वनक्षेत्रपाल 18, वनपाल 30, वनरक्षक 50 असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच वन विभागाच्या मदतीला पोलिसांचीही कुमक तैनात करण्यात आली आहे.
Drone surveillance by Sangli Forest department on Nagpanchami