जितेंद्र बैसाणे, TV9 मराठी, नंदुरबार : मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) महामंडळाच्या अनेक बसचं (Maharastra ST Bus) बुकिंग राजकीय नेत्यांनी (Maharashtra Politics) केलं. पण त्याचा फटका आता जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीवर होताना पाहायला मिळतोय. नाहक खोळंब्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. नंदुरबार जिल्ह्यात शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी 150 बसचं बुकिंग करण्यात आलं. त्यामुळे जिल्ह्यातील एस बस सेवा पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एसटी बसच्या अनेक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे काहींच्या वेळा बदलण्यात आल्यात. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसलाय.
आज दसरा आहे. अनेक जण दसऱ्यानिमित्त नातलगांकडे, पाहुण्यांकडे ये-जा करत असतात. पण नंदुरबारमध्ये एसटी बस अभावी प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. नंदुरबार आगारामधून सोडण्यात येणाऱ्या अनेक एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आलाय.
एकीकडे एसटी बस सेवा नाहीये, तर दुसरीकडे खासगी वाहनांच्या चालकांनी याचाच गैरफायदा उचललाय. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना अचानक भाडेवाढ करण्यात आलीय. त्यामुळे नंदुरबारमध्ये लोकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावं लागलंय.
अनेक प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय. नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या चार एसटी आगारामधून एकूण 150 बसचं बुकिंग शिंटे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी करण्यात आलंय.
आज मुंबई बीकेसीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील तब्बल 1800 एसटी बसचं बुकिंग करण्यात आली असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यासाठी शिंदे गटाकडून जवळपास 10 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचंही केसरकर यांनी म्हटलं होतं. एकीकडे कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्याला येण्यासाठीची सोय झाली असली, तरी दुसरीकडे स्थानिक प्रवासी वाहतुकीला फटका बसल्याचं प्रातिनिधिक चित्र नंदुरबार जिल्ह्यातून समोर आलंय.