हसन मुश्रीफ नेमके गेले कुठे? ईडीच्या साडेनऊ तासाच्या झाडाझडतीनंतरही संपर्काबाहेर; उद्या चौकशीला जाणार?

| Updated on: Mar 12, 2023 | 10:50 AM

ईडी कारवाईच्या 24 तासानंतरही आमदार हसन मुश्रीफ संपर्का बाहेर आहेत. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुश्रीफ यांचा सीए सुद्धा ईडीच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हसन मुश्रीफ नेमके गेले कुठे? ईडीच्या साडेनऊ तासाच्या झाडाझडतीनंतरही संपर्काबाहेर; उद्या चौकशीला जाणार?
Hasan Mushrif
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एक दोन नव्हे तर तब्बल साडेनऊ तास ईडीने ही झाडाझडती केली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ घरात नव्हते. ईडीच्या या छापेमारीनंतर मुश्रीफ यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. तब्बल 24 तास उलटले तरी मुश्रीफ यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी कुणाशीही संपर्क साधलेला नाही. तसेच आपलं म्हणणंही मांडलं नाही. मुश्रीफ संपर्काबाहेर असल्याने मुश्रीफ गेले कुठे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

नलावडे साखर कारखान्याप्रकरणी काल ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा मारला. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. पहाटेच ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. मुश्रीफ यांच्या घरातील लोकांनाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच बाहेरच्या लोकांना आत प्रवेश नाकारला जात होता, असं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

रक्त वाहत होतं तरीही आंदोलन

मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती मिळताच मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेऊन या कारवाईचा निषेध केला. शेकडो मुश्रीफ समर्थकांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. काहींनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. काहींनी तर बनियनवरच आंदोलन सुरू केलं. एकाच्या तर डोक्याला मार लागला होता. त्याच्या कपाळावरून रक्त भळाभळा वाहत होत. पण तरीही हा मुश्रीफ समर्थक जोरदार घोषणाबाजी करत होता.

आम्हाला गोळ्या घाला

त्यानंतर मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा या आंदोलकांमध्ये आल्या. त्यांनीही ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला. वारंवार धाडी मारल्या जात आहेत. त्यापेक्षा एक करा. आम्हाला गोळ्या तरी घाला, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तर, राज्य सरकार सुडबुद्धीने कारवाई करत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना कारवाईची माहिती आधीच कशी असते? असा सवाल मुश्रीफ समर्थकांनी केला आहे.

मुश्रीफ यांना समन्स

दरम्यान, ईडी कारवाईच्या 24 तासानंतरही आमदार हसन मुश्रीफ संपर्का बाहेर आहेत. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुश्रीफ यांचा सीए सुद्धा ईडीच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच ईडीकडून मुश्रीफ यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स देण्यात आलं आहे. त्यामुळे मुश्रीफ उद्या चौकशीला सामोर जाणार की वकीलामार्फत बाजू मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.