चार दिवसांपासून मुसळधार, आठ रस्ते गेले वाहून, दुरुस्ती केव्हा होणार?

| Updated on: Jul 24, 2023 | 8:12 PM

सिरोंचा तालुक्यातील आठ रस्ते वाहून गेले. लंकाचेन मार्ग जवळपास 15 गावांना जोडणारा एकमेव मार्ग होता. पण, हा रस्ताही पुरात वाहून गेला.

चार दिवसांपासून मुसळधार, आठ रस्ते गेले वाहून, दुरुस्ती केव्हा होणार?
Follow us on

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्गम भागातील रस्ते वाहून गेले. सिरोंचा तालुक्यातील आठ रस्ते वाहून गेले. लंकाचेन मार्ग जवळपास 15 गावांना जोडणारा एकमेव मार्ग होता. पण, हा रस्ताही पुरात वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. कंबलपेटा मार्गही वाहून गेला. या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे. नारायणपूर करास्पल्ली मार्गही पूर आल्यामुळे पूर्णपणे वाहून गेला.

या मार्गांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. वाहून गेलेले मार्ग पुन्हा सुरू करण्यात यावेत. अशी मागणी शाळकरी विद्यार्थी आणि एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

सध्या गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा, पामुलागौतम, पर्लाकोटा हे नदीया पूर्ण शंभर टक्के भरभरून वाहत आहे. गडचिरोली जिल्ह्यात गोसेखुर्द, मेडिगट्टा, कडेम धरणातून पाणी सोडल्यास पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होईल.

बंद असलेले मार्ग

1. अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा (वटरा नाला) (अहेरी)

2. लाहेरी-कुवाकोडी (बिनागुंड नाला) (भामरागड)

3. अंकीसा- चिंतरवेला (स्थानिक नाला) (सिरोंचा)

4. बामणी-कंबलपेठा-फुसुकपल्ली (स्थानिक नाला) (सिरेांचा)

5. टेकडाताला – बोरमपल्ली (स्थानिक नाला) (सिरोंचा)

6. बेजुरपल्ली – परसेवाडा (स्थानिक नाला) (सिरोंचा)

7. जॉर्जपेठा- परसेवाडा (स्थानिक नाला) (सिरोंचा)

8. लंकाचैन- मोयाबिनपेठा (स्थानिक नाला) (सिरोंचा)

 

शेकडो हेक्टरमधील पिके धोक्यात

वाशिमच्या केनवड, कोयाळी जाधव,नेतंसा, नावली, जांब, गोवर्धन, कळम गव्हाण सह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने शेतीसह सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसरातील कांच नदीसह नाल्यांना मोठा पूर आला. नदी, नाल्याकाठची शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कपाशी, तूर आणि भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत.

पूरबाधितांना अन्नधान्याचे वाटप

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात पूरग्रस्त असलेल्या आनंद नगर गावात एकविरा देवी संस्थान हिवरा संगमच्या वतीने सर्व पूरबाधित नागरिकांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. या गावातील 110 कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका धान्य मदत देण्यात आले.