वाशिम : येत्या 14 मार्च रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. या भूकंपामुळे भलेभले हादरून जाणार आहेत, अशी भविष्यवाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. बावनकुळे यांची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. आज काँग्रेसचे माजी खासदार गांधी-पायलट-विलासरावांचे निकटवर्तीय तसेच विदर्भातील मास लीडर अशी ज्यांची ओळख आहे ते अनंतराव देशमुख आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या शेकडो समर्थकांसह ते भाजपमध्ये येणार असल्याने काँग्रेससाठी हा मोठी झटका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विदर्भ काँग्रेसचं मोठं नुकसान होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
अनंतराव देशमुख हे विदर्भातील बडे नेते आहेत. वाशिम जिल्ह्याच्या राजकारणाचे ते केंद्रबिंदू आहेत. पश्चिम विदर्भातील मास लीडर म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय ते माजी मंत्री असून माजी खासदारही आहेत. आज ते आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत. देशमुख यांचा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतच पार पडणार आहे. यावेळी त्यांचे चिरंजीव नकुल देशमुखही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने भाजपला बळ मिळणार असून काँग्रेससाठी हे मोठं नुकसान असल्याचं सांगितलं जात आहे.
अनंतराव देशमुख हे राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री होते. ते वाशिम- अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. वाशिमच्या राजकारणाचं पान त्यांच्याशिवाय हलत नाही. पश्चिम विदर्भातील मास लीडर अशी त्यांची ओळख आहे. देशमुख हे राजीव गांधी यांचे अत्यंत जवळचे होते. माधवराव सिंधिया, राजेश पायलट हे त्यांचे वर्गमित्र होते. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलाराव देशमुख यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते. गेल्या काही वर्षांपासून अनंतराव देशमुख काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. मात्र, आता मुलासह ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने ते पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत.
अनंतराव देशमुख भाजपमध्ये आल्याने विदर्भात खासकरून पश्चिम विदर्भात भाजपला फायदा होणार आहे. पण देशमुख यांचं पुनर्वसन कसं करणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. कारण भावना गवळी या वाशिमच्या खासदार आहेत. त्या शिंदे गटात आहेत. त्या ही जागा सोडणार नाहीत. अकोल्यात संजय धोत्रे हे खासदार आहेत. ते भाजपचे विद्यमान खासदार आहेत. त्यांचं अकोल्यात चांगलं काम आहे. त्यामुळे धोत्रे यांचाही पत्ता भाजप कापणार नाही. त्यामुळे अनंतराव देशमुख यांचं भाजपकडून कशा पद्धतीने पुनर्वसन केलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.