लातूर : एकिकडे बेड, व्हेंटिलेटर, औषधं मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट सुरु आहे. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागत आहेत. दुसरीकडे मृत्यूनंतरही कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्रास संपत नसल्याचं दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील शेळगावमध्ये सकाळी अंत्यविधी केल्यानंतर सायंकाळी पुन्हा दफन केलेला मृतदेह उकरून बाहेर काढावा लागल्याची घटना घडलीय. मृतदेहांची अदलाबदल झाल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. त्यामुळे नातेवाईकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला (Exchange of Corona patient dead body in Latur due to irresponsible health worker).
मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये पॅकबंद, नातेवाईकांकडून दुसऱ्याच व्यक्तीवर अंत्यसंस्कार
चाकूर तालुक्यातल्या 65 वर्षीय धोंडीराम तोंडारे यांना लातूरच्या विलासराव देशमुख आरोग्य विज्ञान संस्थेत अॅडमिट करण्यात आले होते. बुधवारी (5 मे) उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या नंतर आज (6 मे) रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तोंडारे यांच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह सुपूर्द केला. नातेवाईकांनीही तो मृतदेह घेऊन शेळगावच्या आपल्या शेतात दफनविधी उरकला. मात्र, प्रत्यक्षात तो मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा होता. मृत धोंडीराम तोंडारे यांचे पत्नी, मुलेही पॉझिटिव्ह असल्याने त्या तणावात नातेवाईकांनीही बॅगमध्ये पॅकबंद असलेला मृतदेह निरखून पाहिला नाही.
नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड
इकडं हॉस्पिटलमध्ये बीड जिल्ह्यातल्या हातोला गावचे लोक आबासाहेब चव्हाण (वय 45) यांचा मृतदेह घ्यायला आले. त्यांना चव्हाण यांचा मृतदेह म्हणून धोंडीराम तोंडारे यांचा मृतदेह देण्यात आला. तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह निरखून पाहिला आणि हा आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह नसल्याचे सांगितलं. त्या नंतर मात्र हॉस्पिटलमध्ये मृतदेह शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली.
अखेर शेतातील दफन केलेला मृतदेह पुन्हा उकरुन काढला
बुधवारी जवळपास एकाच वेळेत मृत झालेल्या रुग्णांचा शोध घेण्यात आला. तेव्हा कळले की धोंडीराम तोंडारे यांचा मृतदेह समजून आबासाहेब चव्हाण यांचाच मृतदेह शेळगावला पाठवण्यात आला आहे. हॉस्पिटलचे कर्मचारी आणि नातेवाईक यांनी मृतदेह घेऊन शेळगाव गाठले. अखेर दफन करण्यात आलेला आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने काढून त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला. त्या ठिकाणी धोंडीराम तोंडारे यांचा दफनविधी करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामूळे नातेवाईकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा :
व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका मिळाली नाही, कोरोनामुळे NSG ग्रुप कमांडरचा मृत्यू
चक्क स्मशानभूमीबाहेर ‘हाऊस फुल्ल’चा बोर्ड; कोरोनानं परिस्थिती चिघळली
आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू, वीस दिवसात वडिलांचं निधन, कोरोनाने कुटुंब संपवलं
व्हिडीओ पाहा :
Exchange of Corona patient dead body in Latur due to irresponsible health worker