चंद्रपूर : चंद्रपुरात हरविलेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) जाहिरातबाजी केली. जोरू नावाचा दोन वर्षे वयाचा कुत्रा आहे. त्याची हाईट तीन ते साडेतीन फूट आहे. 24 फेब्रुवारीपासून तो हरविला आहे. तो लॅबराडोर मिक्स जातीचा गोल्डन कलरचा (Labrador Mix Breed Golden Color) आहे. रमाला तलाव, गंजवार्ड, भानापेठ, पटेल हायस्कूल, कस्तुरबा चौक, बगड खिडकी, मोहतावाडी, श्रीराम वार्ड, ताडबन कोष्टी मोहल्ला, कन्नमवार चौक या भागातून त्याला चोरून नेण्यात आले. यासंदर्भात कुणाला माहिती मिळाल्यास त्यांनी डॉ. दिलीप कांबळे (Dr. Dilip Kamble), प्रतीभा कांबळे यांच्याशी संपर्क साधावा. चंद्रपुरातील रमाला तलावासमोरील कांशी सी टी स्कॅन अँड एमआरआय सेंटर येथे संपर्क साधावा, यासाठी त्यांनी आपले मोबाईल क्रमांकही दिले आहेत.
तर दुसरीकडं, नागपुरात कुत्र्याचे वारंवार भूंकणे चांगलेच जिव्हारी लागले. त्यामुळं काही समाजकंटकांनी त्याला रस्त्याच्या मधोमध बांधून ठेवले. रस्त्याच्या मध्ये बांधून ठेवल्याने त्याचा मृत्यू होईल, असा त्यांचा समज होता. पण, कुत्र्याचे दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. ही घटना वर्धा मार्गावर घडली. सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनची कार्यकर्ती रस्त्याने जात होती. तिला कुत्रा साखळीने बांधलेल्या अवस्थेत दिसला. हा कुत्रा आमच्याच वस्तीतील असून तो नेहमी भुंकत राहतो म्हणून त्याला बांधून ठेवल्याचं स्थानिकांचं म्हणण होतं. संस्थेच्या संचालिका स्मिता मोरे यांना तर हा कुत्रा आमच्या भागात नको अन्यथा आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकीच दिली. कुत्राची सुटका झाल्यानंतर तो पळून गेला.
नागपुरात भटक्या कुत्र्यांनी एका महिलेला जखमी केल्याची घटना काल घडलीय. सुमित्रा ठाकरे असं जखमी महिलेचं नाव आहे. वाठोडा येथील राधाकृष्णनगरात त्या राहतात. त्यांच्यावर अचानक बेवारस कुत्र्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात सुमित्रा ठाकरे गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. महापालिका प्रशासनाने बेवारस कुत्र्यांना पकडावे आणि त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केल्याचं संजय काळे यांनी सांगितलं.