चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर (Ballarpur) तालुक्यातील कळमना ( Kalmana) येथे पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आग अद्याप सुरूच आहे. जिल्हा व आसपासच्या अग्निशमन (Fire Brigade) यंत्रणांच्या 40 बंबानी 350 हुन अधिक फेऱ्या करूनही आग धुमसणे सुरूच आहे. रात्रभर ही आग विझविण्याचे कार्य चालले. 20 एकरांवर पसरलेल्या लाकूड डेपोची यात राख झाली. 50 कोटींहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आग कमी झाल्यावर पहाटे या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. याच डेपोच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला आग लागली होती. मात्र साठा नसल्याने पंप 3 दिवसांपासून बंद होता. त्यामुळे मोठी हानी टळली. प्रचंड आग-सोसाट्याचा वारा आणि जलस्त्रोतापासून जास्त असलेले अंतर यामुळे अग्निशमन बंबाना पाणी भरून आणण्यासाठी वेळ लागतोय.
सकाळपासून अग्निशमन कार्याने वेग घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जुन्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगाने लाकूड आगारात अग्निशमन यंत्रणा उभारताना अक्षम्य हलगर्जीपणा दाखविण्यात आले. जिल्हा व आसपासच्या यंत्रणांना नाहक त्रास आणि आगीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय. जिल्हा प्रशासन या उद्योगावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या बंबांचे आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर येथून अग्निशमन दलाच्या बंब आले. वरिष्ठ महसुली व पालिका अधिकाऱ्यांसह पेपर मिलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. पण, या आगीला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
कळमना गावाजवळ झालेल्या पेपर मिल लाकूड साठवण भीषण अग्निकांडात अनोखी माणुसकी दिसली. या अग्निकांडानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला. त्यामुळे चंद्रपूर- आष्टी महामार्गावर दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या. यात बस प्रवासी वऱ्हाडी व खाजगी ट्रक- वाहनांचा देखील समावेश होता. स्त्रिया- लहान मुले व वृद्ध यांची भुकेली अवस्था बघून स्थानिक युवक आणि ग्रामस्थ पुढे सरसावले. स्थानिक युवकांनी निधी एकत्र करत ताटकळलेल्या प्रवाशांना पाणी- चहा व बिस्किटे अशी खाद्य सामुग्री पुरविली. स्थानिक युवकांच्या या पुढाकाराचे प्रवाशांनी आभार मानले. मात्र ताटकळलेल्या प्रवाशांसाठी मदत पुरवण्यास प्रशासन अपयशी ठरले.