रत्नागिरी: या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण आणि रत्नागिरीत अभुतपूर्व पूरपरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील इतर भागातील व्यापाऱ्याचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या व्यापाऱ्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र, प्रशासनाचा एकूण कारभार आणि लौकिक पाहता त्यासाठी आणखी काळ प्रतीक्षा करावी लागेल.
या पार्श्वभूमवीर आता जिल्हा बँक या व्यापाऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. जिल्हा बँकेने या व्यापाऱ्यांना 50 हजार ते 50 लाखापर्यंतचे कर्ज 5 टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर हे कर्ज फेडले नाही तरी चालेल, अशी तयारी जिल्हा बँकेनं दर्शवली आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली . त्यानुसार आता चिपळूण, खेड याठिकाणी गरजेप्रमाणे कर्ज मंजुरी कक्ष देखील उभारले जाणार आहेत.
पुराच्या पाणी शिरलेल्या महाड शहरातील सर्व रस्त्यांवर, घरात, दुकानात मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. येत्या तीन दिवसांत हा सर्व चिखल स्वच्छ केला जाणार आहे. रायगड जिल्ह्यतील सर्व नगरपालीकेच्या टीम, स्वच्छता व आरोग्याच्या द्रुष्टीने कार्यरत आहेत. पनवेल महानगरपालीका, नवी मुबंई महानगरपालीका, ठाणे महानगरपालीका, मुंबई महानगरपालीका, पुणे महानगरपालीका, धर्माधिकारी प्रतिष्टान, हिंद महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या टीम महाड शहरात स्वच्छता व आरोग्याच्या द्रुष्टीने कार्यरत आहेत. जे सी बी, पोक्लेन, अनेक मोठे यंत्र याठिकाणी आणण्यात आली आहेत.
अनेक रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. तरीही रोज प्रत्येक घरातुन, दुकानातुन कचरा निघत आहे. तसेच प्रत्येक नागरिकांच्या डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, कावीळ व कोरोनाच्या टेस्ट केल्या जाणार आहेत.
संबंधित बातम्या:
VIDEO | थांब रे, मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच प्रवीण दरेकरांना गप्प केलं
Video: सीएम बीएम गेला उडत, आम्हाला नावं नका सांगू कुणाची? राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले
(Low Interest rate loan for traders in Konkan Region)