व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिण भागात पूरस्थिती गंभीर झाली आहे. गोदावरी खोऱ्यात तेलंगणा राज्यात अतिमुसळधार पाऊस पडला आहे. परिणामी गोदावरी नदी पात्र सोडून वाहू लागली आहे. त्याचा परिणाम टोकावरच्या सिरोंचा तालुक्याला बसला आहे. सीमेवरच्या मेडीगड्डा धरणातूनही महाविसर्ग सुरू आहे. 24 तासांपासून गडचिरोली जिल्ह्यातील या परिस्थितीवर स्वतः जिल्हाधिकारी संजय मिना वॉर रूममधून लक्ष ठेवत आहेत. तेलंगणात मुसळधार पावसामुळे तिथल्या धरणांमधून विसर्ग केला जातो. मागील वर्षी झालेली पूरस्थिती यंदाही कायम राहणार आहे. सिरोंचा येथे गोदावरी नदीने 105 मीटरची धोका पातळी ओलांडली आहे. या तालुक्यातील एकूण 17 गावांमध्ये दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. 334 हुन अधिक नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे.
सिरोंचा येथे औषधे, रुग्णालय व निवास, भोजन व्यवस्थेसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 14 रस्ते बंद झाल्याची माहिती आहे. सध्या पाऊस सुरूच असून जिल्ह्यात जुलै महिन्यात वार्षिक सरासरीच्या 153% पाऊस नोंदविला गेला आहे. आपत्कालीन मदतीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने हेलिकॉप्टर्सदेखील सज्ज ठेवली आहेत.
तेलंगणात उद्भवलेली पूर परिस्थिती आणि तेथील धरणातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील नदी काठावरील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथे रेड अलर्ट घोषित केला आहे. सिरोंचा तालुका महाराष्ट्राच्या सीमेवरील तालुका असून सीमेला लागून तेलंगणाचा भाग आहे. गोदावरी आणि प्राणहिता नदीला तेलंगणातल्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
तेलंगणामधली काही शहरे पुराच्या तडाख्यात सापडलेत. पाणी गोदावरी आणि प्राणहिता नदीमध्ये येत आहे. उद्या सकाळपर्यंत नदीकाठावरील अनेक गावांमध्ये गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सिरोंचातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेलंगणातील धरणाचा गोदावरी, प्राणहिता नदीला महापूर आला आहे. सिरोंचा तालुक्यात 28 व 29 जुलैला शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.