गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती व वैनगंगा (Wainganga) चार नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर आलाय. चारी नद्या आजही धोका पातळीच्या वर वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मागील एक आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू होता. एक आठवड्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यातील पुरामुळे अनेक मार्ग बंद मार्ग झाले होते. सध्या चामोर्शी-गडचिरोली व आलापल्ली-भामरागड हे दोन मार्ग बंद आहेत. सिरोंच्यातील ( Sironcha) सुमारे 40 गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त वाहतुकीचा सिरोंचा करीमनगर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंदच आहे. या राष्ट्रीय महामार्गावर गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भाग असलेल्या सिरोंचा, अहेरी, भामरागड (Bhamragarh), मुलचेरा, एटापल्ली तालुक्यातील जवळपास पाचशे गावांचे नागरिक याच राष्ट्रीय महामार्ग नेहमी प्रवास करतात.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी दोन तालुक्यांना मोठा पुराचा फटका बसला. सिरोंचा तालुक्यातील जवळपास 40 गावे पुराच्या पाण्याखाली आली आहेत. अहेरी तालुक्यातील सहा ते सात गावे पाण्याखाली गेलीत. भामरागड तालुक्यातील सत्तर घरे पाण्याखाली गेली होती. भामरागड तालुक्याला दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला. जिल्ह्यातील भात, कापूस, मिरचीचे मोठं नुकसान झालं आहे. पुरात पेरण्या पूर्ण नष्ट झाल्यात. सर्वात जास्त उत्पन्न देणारे जमीन गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात आहेत. या सर्व जमीन या पुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. सिरोंचा तालुक्यातील 40 गावांमध्ये जवळपास 80 ते 90 घरे पडली. अहेरी तालुक्यातील सात गावांमध्ये जवळपास 17 घरे पडली. सिरोंचा आणि अहेरी येथील मत्स्य पालन करणाऱ्या तलावातील मच्छी व झिंगे पुरात वाहून गेले. मासेमारी करणार्या नागरिकांचे लाखो रुपयाचे नुकसान या पुराने केले.
गडचिरोली जिल्ह्यात महापुरात 40 गावांना जिल्हा प्रशासनाकडून जीवनावश्यक साहित्य प्रत्येक दुर्गम भागात रवाना करण्यात आले. सिरोंचातील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची कमतरता आहे. त्यामुळं डिझेलचे टॅंकर थेट तहसील कार्यालयासमोर उभे करण्यात आले. आवश्यक असणाऱ्या नागरिकांना डिझेल वाटप करण्यात येत आहे. सिरोंचातील 40 गावांमध्ये शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. सर्व्हे केव्हापासून सुरू होणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. गडचिरोली-संपूर्ण जिल्ह्यातील सर्व शाळा-विद्यालय-महाविद्यालय हे बुधवारपर्यंत बंद राहणार आहेत. पुरात काही जनावरे व कोंबड्या वाहून गेल्या. महापूर असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे पाणी सोडल्याने back water cha फटकाही काही गावांना बसला होता.