सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील हळवल गावात गवा रेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. या रेड्यांनी शेतीचे घुसून प्रचंड नुकसान केले आहे. जवळपास अर्ध्या शेतातील उभं पिक या रेड्यांनी खाऊन टाकलं. तसेच उरलेल्या शेतात नाचून शेतीचं नुकसान केलं आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. आधीच आस्मानी आणि सुल्तानी संकटाने घेरलेल्या बळीराजा यामुळे मोठ्या अडचणीत सापडलाय.
तौक्ते वादळ आणि त्यानंतर निर्माण झालेली पूरस्थितीमुळे चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याबाबत वनविभागाने पाहणी करत पंचनामे केले आहेत. गेली 4 वर्षे हळवल गावात गवारेड्यांनी शेतीचे नुकसान करण्याचे सत्र सुरूच आहे.
तौक्ते वादळ आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. असं असतानाच या गवारेड्यांच्या आगमनामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. हळवल परबवाडी येथील शेतीचे गवारेडयांनी प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. परबवाडी येथील या शेतकऱ्याचे सुमारे अडीच एकर भागातील शेतीचे नुकसान झाले आहे.
याबाबत वनरक्षक पल्लवी दाभाडे व हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे तयार केले आहेत. गेली 4 वर्षे हे नुकसानीचे सत्र असेच सुरू आहे. शासनामार्फत मिळणारी नुकसान भरपाई ही तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतीचे होणारे नुकसान आणि मिळणारी भरपाई यात बरीच तफावत आहे. यामुळे या गवारेड्याचा कायम स्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.