नांदेड : नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे झालेले नुकसान हे रडकुंडीला आणणारे आहे. अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलीय. काल झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या नुकसानीची खासदार चिखलीकर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाल्याचे खासदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. खासदारांनी बारड शिवारात नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी, ज्वारी पिकांची पाहणी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपलं बोलणं झालं. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय.
नांदेडमध्ये बारड शिवारात झालेल्या गारपिटीची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाहणी केलीय. त्यांच्यासोबत इतर आमदार आणि कन्या श्रीजया चव्हाण देखील उपस्थित होत्या. यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी चव्हाण यांनी संवाद साधत धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी चव्हाण यांनी केलीय.
गुरुवारी सायंकाळी नांदेडमध्ये झालेल्या गारपिटीचा सर्वाधिक फटका मुदखेड तालुक्यातील बारड शिवाराला बसलाय. या भागातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या केळीच्या बागा वादळी वाऱ्याने आडव्या पडल्या आहेत. तर गहू, हरभरा,ज्वारी आणि भाजीपाला आडवा पडलाय. त्यामुळे बारड शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचे जबर नुकसान झालंय.
नांदेडमध्ये काल सांयकाळी झालेल्या गारपिटीमुळे बारड शिवारातील सगळीच पिके नष्ठ झालीयत. शेतीसह गुरांनादेखील या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसलाय. एकूणच या गारपिटीमुळे काय काय नुकसान झालंय ते शेतकऱ्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. राज्य सरकार आता या नुकसानीचा पंचनामा करून मदत देणार का, याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.
गारपिटीचा फटका मुरखेड तालुक्यातील बारडशिंगा शिवाराला मोठा फटका बसला. केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. गहू, हरभरा, उन्हाळी ज्वारी तसेच भाजीपाला वर्गीय पिकं जमीनदोस्त झाली आहेत. तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.