अहमदनगर : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे क्षेत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे दररोज या मार्गावर अपघाताच्या घटना उघडकीस येत आहे. अशीच एक घटना आज सकाळी घडली आहे. नातेवाईकांना मुंबईला सोडून घरी परतत असताना कुटुंबीयांच्या कारला समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. इनोव्हा कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन हा अपघात घडला. या भीषण अपघातात कारमधील चार जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रज्जाक अहमद शेख, सत्तार शेख, सुलताना सत्तार शेख यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर फैयाज रघुभाई शेख यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जुबेर रज्जाक शेख, मैनुरीसा रज्जाक शेख, अझर बालन शेख आणि मुस्कान अझर शेख हे चौघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व जण मुंबईला गेले होते. नातेवाईक हज यात्रेला चालले होते. त्यांना सोडण्यासाठी हे सर्व जण मुंबईला गेले होते. तेथून घरी परतत असताना ही अपघात घडला.
वर्ध्यातही समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. अनियंत्रीत कार दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. येळाकेळी शिवारात काल दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. नागपूरकडून कार मुंबईकडे जात असताना येळाकेळी शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या सिमेंट दुभाजकाला धडकली. जखमींना समृद्धी महामार्ग रुग्णवाहिकेच्या मदतीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.