सांगली : सांगलीत आज सकाळी भीषण अपघात झाला. विटा नेवरी रोडवर खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाने एअरबॅग उघडल्याने तो वाचला आहे. देवीचं दर्शन घेऊन येत असताना कार चालकाला डुलकी लागली. त्यामुळे कार खासगी ट्रॅव्हल्सवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या प्रकरणी विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
आज सकाळी 7 वाजता हा भीषण अपघात झाला. विट्याहून नेवरीकडे निघालेल्या गितांजली ट्रॅव्हल्सला कारची धडक बसून अपघात झाला. यात तीन पुरुष आणि एक महिला ठार झाल्याची माहिती मिळत आहे. हा धक्कादायक अपघात पाहण्यासाठी या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मुंबईहून विट्याकडे जाणाऱ्या कारने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याचे बोलले जात आहे. कारचालकाला झोप आल्यामुळे हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. परंतु, वारंवार या रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताने या रस्त्याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवाजी नगरच्या पुढे विटा महाबळेश्वर राज्य मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तासगाव तालुक्यातील गवाण येथील काशीद कुटुंब ठार झालं. कारमधून पाचजण प्रवास करत होते. त्यापैकी एक महिला आणि तीन पुरुष जागीच ठार झाले. तर एकजण एअरबॅगमुळे बचावला. ही खासगी ट्रॅव्हल विट्याहून साताऱ्याला जात होती. तर कार साताऱ्याहून विट्याच्या दिशेने येत होती. कार अत्यंत भरधाव वेगात होती. यावेळी कार चालकाला झोप लागली अन् त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. शिवाजी नगर परिसरातील 11 मंदिराच्या पुढे राज्य महामार्गावरील उतारावर कारने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. त्यात संपूर्ण कारचा चेंदामेंदा झाला. कारचे टप उखडून गेले. तर कारचा समोरचा भाग संपूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारचे इंजिनही डॅमेज झाले.
या अपघातात चंद्रकांत काशीद, त्यांची पत्नी सुनीता काशीद आणि मेव्हणा अशोक यांच्यासह कारचालक जागीच ठार झाले. हे सर्वजण 55 वर्षाच्या पुढचे होते. सदानंद काशीद यांनी एअरबॅग उघडल्याने ते वाचले. हे सर्वजण लक्ष्मीदेवीच्या यात्रेसाठी मुंबईहून गावाला येत होते. देवीच्या दर्शनाहून परतत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. हे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. हा अपघात घडल्यानंतर गावातील लोकांनी राज्य मार्गावर प्रचंड गर्दी केली होती. बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांना त्यांना पांगवावे लागले.