नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे आगमन (Ganpati Special News) अवघ्या काही दिवसांत होणार आहे. बाप्पा येणार म्हणून घराघरांत जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पाची प्रतिष्ठापना विधिवत व्हावी यासाठी पुरोहितांना बोलावले जाते. यंदा पुरोहितांची आगाऊ नोंदणी झाली आहे. इतकेच नव्हे, तर महिला पुरोहितांना बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा मान दिला जात आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये महिला पुरोहित या क्षेत्रात सक्रिय झाल्या आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महिला पुरोहितांना प्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण दिले जात आहे. (Ganpati Special News people preferring female priest for Ganesh Chaturthi 2021 in navi mumbai)
मंत्रोच्चार, शुद्ध, स्पष्ट शांतचित्त तसेच एकाग्रतेने महिला पुरोहित पूजा करीत असल्याने भक्तांकडून त्यांना विशेष पसंती दर्शवली जाते. गेल्या काही वर्षांत शहरात महिला पुरोहित मंडळे स्थापन झाली आहेत. शहरात काही ठिकाणी धार्मिक, वैदिक पौरोहित्याचे प्रशिक्षण दिले जाते. पूजापाठ, वेदमंत्रपठण लघुरुद्र, गणेशयाग, नक्षत्रशांती, दुर्गासप्तशक्ती पाठवाचन, वास्तुशांती, गणेशपूजन, सत्यनारायण पूजा, मुंज, साखरपुडा, नवचंडी याग, सहस्त्रचंद्रदर्शन विधी आदी धार्मिक कार्यासाठी महिला पुरोहितांना आवर्जून बोलावले जाते. गणेशोत्सवातच नव्हे, तर वर्षभर महिला पुरोहितांच्या पूजा-अर्चा सुरू असतात.
महिला पुरोहित तसेच सध्याचा गणेशोत्सव यावर घणसोली येथील महिला पुरोहित चिन्मयी जोशी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे महिला पुरोहितांची मागणी वाढत आहे. गणपतीच्या पहिल्याच दिवशी पाच ठिकाणी पूजेसाठी बुकिंग झाली आहे,” असं चिन्मयी जोशी यांनी सांगितलं. तर आजकाल सर्वच स्त्रिया आपल्या पतीच्या कामात सर्रासपणे खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. त्यामुळे पौरहित्यामध्येही स्त्रिया सहभागी होत आहेत. लोकांना भक्ती मार्गकडे वळवून त्यांची अध्यात्मिक शक्ती वाढवण्याचे कामं पुरोहितांकडून केले जाते. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया श्रुती सुश्रुताचार्य वैद्य यांनी दिली.
ऐतिहासिक निर्णय
● बंगालची दुर्गा पूजा जगप्रसिद्ध आहे. यंदा कोलकाताच्या 66 पल्ली दुर्गा पूजा समितीने, दुर्गा पूजा पुरुष पुजाऱ्यांऐवजी चार महिला पुजाऱ्यांकडून करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गतवर्षी पूजा समितीच्या एका वृद्ध पुरुष पुजाऱ्याच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
● तमिळनाडूमध्ये महिला पुजारी बनवण्यावरून बराच काळ वाद झाला होता. 2008 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका आदेशात एका महिला पुजान्याला तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मंदिरात पूजा करण्याची परवानगी दिली. तमिळनाडूच्या मंदिरांमध्ये महिलांना पौरोहित्य करता येईल, असा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला आहे.
इतर बातम्या :
Ganesh Chaturthi 2021 : पुणेकरांनी ऑनलाईन माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, गणपती मंडळांचं आवाहन
शरद पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल
(Ganpati Special News people preferring female priest for Ganesh Chaturthi 2021 in navi mumbai)