बुलढाणा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावात सभा होणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच उद्धव ठाकरे यांचं शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. ही डोकेदुखी असतानाच गुलाबराव पाटील यांची आणखी एका गोष्टीने डोकेदुखी वाढली आहे. बुलढाण्यात गावोगावी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पोस्टर्स लागले आहेत. गुलाबराव पाटील हरवले आहेत… असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे. पोस्टर्स लावणाऱ्यांनी गुलाबरावांच्या विरोधात आंदोलनही केलं आहे. विशेष म्हणजे आंदोलन करणारे आणि पोस्टर्स लावणारे ठाकरे गटाचे नाहीत. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची अडचण अधिकच वाढली आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते बुलढाण्यात फिरकलेच नाहीत. जळगाव ते मुंबई आणि मुंबई ते जळगाव एवढ्यापुरतच त्यांनी स्वत:ला मर्यादित केल्याने येथील नागरिकांमध्ये संताप आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी बुलढाण्यातील गावागावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावले आहेत. शोधून देणाऱ्यांना पैसेही जाहीर केले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये सध्या या पोस्टर्सची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. पोस्टरवर गुलाबराव पाटील यांचा फोटो आहे. त्यावर पालमंत्री बेपत्ता असं लिहिलं आहे. तसेच शोधून देणाऱ्यांना 51 रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संपर्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी स्वत:चं नाव आणि मोबाईल नंबर दिला आहे. गावागावातील नाक्यानाक्यावर, चहा आणि पान टपऱ्यांवर हे पोस्टर्स लावले आहेत. हे पोस्टर्स पाहण्यासाठी गावागावात झुंबड उडाली असून नाक्यावर, चहाच्या टपऱ्यांवर, चावडीवर आता या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे सरकार स्थापन होऊन जवळपास दहा महिने झाले, पालकमंत्र्यांची नियुक्ती होऊन नऊ महिने झाले, या काळात अतिवृष्टी तर कुठे चक्रीवादळामुळे शेतकरी त्रस्त असताना अद्यापही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केलेला नाही. पाटील यांनी साधं शेतकऱ्यांचा सांत्वन सुद्धा केलेलं नाही. त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील अनेक गावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर झळकवले आहेत. जागोजागी अनेक ठिकाणी मुख्य महामार्गावर तर गावातील पान टपऱ्यांवर हे पोस्टर झळकत आहेत. नागरिकही हे पोस्टर बघून कुतूहल व्यक्त करत आहेत.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. गुलाबराव पाटील गेले कुठे? कधी येणार गुलाबराव? अशा घोषणा या आंदोलकांनी दिल्या असून सरकारच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या आहेत.