धुळे : कोरोना महामारीच्या कठीण काळात जीवावर उदार होऊन अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. मात्र, धुळ्यात ठेका पध्दतीने सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाने कामावरुन कमी केलं. त्यामुळे या कोविड योद्ध्यांवर समायोजनासाठी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण करण्याची वेळ आलीय.
या कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाचा आज (14 ऑगस्ट) पाचवा दिवस उजाडला आहे. कुठल्याही प्रशासनाच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांची दखल न घेतल्याने आणि त्यांची तब्येत देखील खालावली आहे. त्यामुळे आमच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील असल्याचा इशारा देखील या उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोरोना महामारीच्या काळात 7 मार्च 2020 ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत 250 रुपये प्रतिदिन या रोजंदारी पध्दतीने कामगार म्हणून 70 जण काम करत होते. ज्या काळात बाधितांच्या जवळ त्यांचे जवळचे नातेवाईक जायला घाबरत. अशावेळी जीवाची पर्वा न करता या कामगारांनी सेवा बजावली. असं असताना शासनाने 1 ऑगस्टपासून आम्हाला कामावरुन कमी केले आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असं मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलंय.
सद्यस्थितीत कोरोनाचा धोका कमी झालेला नसून तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. हिरेमध्ये या कामासाठी 150 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कामावरुन काढून टाकणे हा अन्याय आहे. बिकट परिस्थितीत काम केले म्हणून शासनाने कोविड योध्दाची पदवी दिली. मात्र, दुसरीकडे कामावरुन काढून टाकले. त्यामुळे आम्हाला तात्काळ भरती करून घ्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून अनेकांची प्रकृती खालावली आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आले नाही. त्यामुळे आमच्या जीविताचे बरेवाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.