कोल्हापूर : एका आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. त्यामुळे आंदोलकांमध्ये एकच आफरातफर माजली. एक आंदोलक तर थेट पोलिसांच्या गाडीवर चढला होता. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला.
कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटसवरून वाद निर्माण झाल्यानंतर आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तसेच मोर्चा काढणार असल्याचंही हिंदुत्ववाद्यांनी जाहीर केलं. तर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आधीच जमाव बंदीचे आदेश लागू केले होते. मात्र, हे आदेश झुगारुन हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले. जमाबंदी आदेश आणि पोलिसांनी बंद मागे घेण्याचं केलेलं आवाहन झुगारून हे आंदोलन करण्यात आलं. मात्र, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोर्चाच्या ठिकाणी प्रचंड मोठा बंदोबस्त ठेवला होता. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सकाळी 10 वाजता हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. 11 वाजेपर्यंत हजारो कार्यकर्ते चौकात जमले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच औरंगाबादेत औरंगजेबाचा फोटो फडकवणाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात आंदोलकांनी भगवे फेटे आणि भगवे शेले घातले होते. जमाव मोठ्या प्रमाणावर जमला होता. जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी त्यांना दाद दिली नाही. उलट आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.
पोलिसांनी लाठीमार करताच आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. काही आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना लाठीचा मार दिला. त्यामुळे आंदोलकांची एकच पळापळ सुरू झाली. दिसेल तिथे आंदोलक पळत होते. आंदोलक सैरभैर पळत असताना पोलीसही त्यांच्या मागे जाऊन त्यांना लाठीचा प्रसाद देत होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं नाही. मात्र, कोल्हापुरात अजूनही तणाव आहे. मोर्चाच्या ठिकाणी आणि संवेदनशील परिसरात पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली आहे.