रत्नागिरी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपसोबत युती करणार की शिंदे गटासोबत? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता पुन्हा या चर्चेने जोर धरला आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठं राजकीय विधान केलं आहे. राज ठाकरे आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं वेलकमच आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले. सत्तार यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. राज ठाकरे शिंदे गटासोबत येणार की नाही? याकडे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे सुद्धा शिंदे यांच्यासोबत रत्नागिरीत आले आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणुका कधीही लागतील. दारुगोळा साठवून ठेवलेला बरा, असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं असता सत्तार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे.
मनसेने कोणासोबत जायचं हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांनी कुणासोबत जावं हा त्यांचा निर्णय आहे. पण ते आमच्यासोबत आले तर वेलकम. आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना सन्मानाने आमच्यासोबत येण्याचं आवाहन केलं आहे. पण शेवटी निर्णय राज ठाकरे यांचा आहे. ते काय निर्णय घेतील हे कुणीही सांगू शकत नाही, असं सत्तार म्हणाले.
रत्नागिरीतील ठाकरे गटाचे पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना आधीच खिंडार पडलेलं आहे. खिंडारवाल्यांना किती खिंडार पाडणार याबद्दल मला माहीत नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं. तसेच मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी आज जी घोषणा करतील त्याचं कृषी विभागाकडून तंतोतंत पालन केलं जाईल, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचा उद्या महामोर्चा निघणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कितीही लोकं आले तरी सरकार कधी घाबरत नाही. कायदा सुव्यवस्था कायम राहील याची विरोधकांनी खबरदारी घ्यावी. शेवटी काही नियम असतात, काही धोरण असतात त्याचं पालन करावं आणि मोर्चा काढावा. आम्ही कुणाला अडवलं नाहीये, असं मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.