शिर्डी : साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत ठरलेल्या शिर्डीला देवाची नगरीही संबोधलं जातं. रोजच शिर्डीत शेकडो भाविक येत असतात. साईबाबांचा आशीर्वाद घेत असतात. नवस फेडत असतात. त्यामुळे शिर्डी कायम चर्चेत असते. कधी भक्तांच्या गर्दीमुळे, कधी साईबाबांना देण्यात आलेल्या सोनं, चांदी, हिरे आणि दानामुळे. पण सध्या याच देवाच्या नगरीच्या पावित्र्याला धक्का बसेल अशी घटना घडली आहे. शिर्डीत चक्क देहव्यापार सुरू असल्याचं उघड झालं आहे. शिर्डीतील हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांना टिप मिळाली आणि मोठं रॅकेट उघड झालं आहे.
शिर्डीत काही हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या 6 हॉटेलवर एकाचवेळी छापे मारले. पोलिसांनी अचानक मारलेल्या छाप्यांमुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांपासून ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. काही जण हॉटेलमधून पळण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं. तसेच हॉटेलच्या प्रत्येक रुममध्ये जाऊन चौकशी केली. संबंधितांचे आयकार्ड तपासले. तसेच ते कशासाठी या हॉटेलात आले याची माहितीही घेतली. तसेच संशयितांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी या छापेमारीत 15 पीडित मुलींची सुटका केली. तसेच 11 आरोपींना घेतलं पोलिसांनी ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॉटेलचा स्टाफही असल्याचं सांगितलं जातं. श्रीरामपूरचे विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली. श्रीरामपूर पोलिसांच्या या कारवायांमुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे आणि हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी सापळा रचून शिर्डीतील सहा हॉटेलवर एकाच वेळी छापा मारल्याचं वृत्त आल्याने या हॉटेलभोवती बघ्यांनी गर्दीही केली होती.
पोलिसांनी काही ग्राहकांना ताब्यात घेतलं आहे. पीडित मुली कधीपासून या व्यवसायात आहे? त्यांचं रॅकेट आहे काय? याची माहिती पोलीस घेत असून अधिक तपास करत आहेत. आरोपींविरोधात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय शिर्डीतील इतर हॉटेलात असे प्रकार घडत आहेत काय? याची माहितीही पोलिसांकडून घेतली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने शिर्डी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.