चंद्रपूर : विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर पाऊस कमी होणार असल्याचे हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी सांगितले. विदर्भात रविवारपासून पावसाचा कुठलाही अलर्ट नाही. ३० जुलैपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे. नागपुरात परवा १६४ मिमी पाऊस पडला. हा दहा वर्षांतला दुसरा रेकॅार्ड होता. दिवसा वाढलेलं तापमान आणि ह्युमिडीटी असल्याने विजांचा कडकडाट झालाय, असंही मोहन शाहू यांनी म्हंटलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. राजनगर आणि सहारा पार्क भागात इरई नदीचे पाणी शिरले, या भागात असलेल्या घरांना 8 ते 10 फूट पाण्याचा वेढा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने पूरग्रस्त भागातून लोकांना काढण्यास सुरुवात केली. इरई धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाची लोकांना राजनगर-सहारा पार्क भागातून रेस्क्यू करण्याला प्राथमिकता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण, बेंबाळ प्रकल्प आणि वेण्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीच्या पात्रात मोठी वाढ होत आहे. वर्धा नदीचं पाणी पुलावरून जात असल्यामुळे कालपासून धानोरा-भोयेगाव-गडचांदूर हा मार्ग बंद आहे. आज सकाळपासून बल्लारपूर-बामनी-राजुरा हा हैद्राबाद- तेलंगणात जाणारा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. यामुळे वर्धा नदी पुलाच्या दोन्ही बाजूस बल्लारपूर आणि राजुरा या दोन्ही शहरात मालवाहू ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आज पहाटेपासून पाऊस सुरू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे पैनगंगा- वर्धा नदीपट्टा, माणिकगड डोंगर आणि सखल मैदानी प्रदेशातील शेत शिवारातील शेतपिकाना जबर तडाखा बसलाय. शेकडो ठिकाणी जमीन खरडून उभे पीक जमीनदोस्त झाले. अनेक मार्ग ठप्प पडले. तालुक्यातील थिपा, आवारपूर, हिरापूर अंतरगाव, सांगोडा, वनोजा आदी गावालगतच्या शेत शिवारातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला आदी पिकाचे अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात आला आहे. कन्हाळगाव गावात नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचले जात असल्याने कोरपना – आदिलाबाद , डझनभर अन्य मार्ग अधून-मधून ठप्प पडत आहेत. भोयगाव -धानोरा मार्ग पुरामुळे बंद पडला आहे. मालवाहतुकीचे ट्रक तासनतास अडकून पडले आहेत.