विरार : पावसाळा सुरु झाला आहे. पावसामुळे नद्या, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून वारंवार जनतेला नदी, समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत तरुणाई धोका पत्करत आहे. यामुळे अनेकदा जीव गमवावा लागत आहे. अशीच घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. मित्रांसोबत अर्नाळा समुद्रावर पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमित संतोष गुप्ता असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमित गुप्ता हा नालासोपारा पूर्वेतील आचोळे येथील रहिवासी आहे. गुरुवारी सायंकाळी अमित तीन मित्रांसोबत अर्नाळा समुद्रावर पोहायला गेला होता. सर्व मित्र समुद्रात पोहायला गेले. पाण्याचा न आल्याने अमित बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. मित्रांना अमित बेशुद्ध असल्याचे वाटल्याने त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विरार पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करत शून्य नंबरने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तपासासाठी पाठवले आहे.
वसई विरार नालासोपाऱ्यात मागच्या 4 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. वसई तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीही हौशी पर्यटक समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोहत असल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊन आपला जीव गमावू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.