जळगाव:मध्यप्रदेश आणि विदर्भात जोरदार पावसामुळे हतनूर धरणात साठा वाढला असल्यानं सलग दुसऱ्या दिवशी हतनूर धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले असून यातून 37 हजार 575 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागानं आणि जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा दुसऱ्या दिवशी ही भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे हातनूर क्षेत्रात पाण्याची पातळी वाढल्यामुळे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत, अशी माहिती हतनूर प्रशासनाची आहे. हतनूर धरणातून 37575 क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगावात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीकाठच्या गावात नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
येत्या काही तासात नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता द्वार परिचालन करण्यात येईल आणि नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल. तसेच पुढील 24 ते 48 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये आणि नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनाने कडून कळविण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO | जळगावात तुफान पाऊस, हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले
दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे जळगाव महापालिकेत आले; मात्र नगरसेवकांच्या पदरी निराशाच
(Jalgaon hatnur dam 16 gates opened to release in Tapi river due to rain in watershed area)